Top Newsराजकारण

सिद्धूंच्या समर्थनार्थ पंजाबच्या मंत्री रझिया सुल्ताना यांचा राजीनामा

नवी दिल्ली : पंजाब काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावरून नवज्योतसिंग सिद्धू यांनी राजीनामा दिल्यानंतर एका कॅबिनेट मंत्र्यानेही मंगळवारी राजीनामा दिला आहे. नवज्योतसिंग सिद्धू यांच्या समर्थनार्थ पंजाबच्या मंत्री रझिया सुल्ताना यांनी राजीनामा दिला असल्याचे सांगितले जात आहे. मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्या नवीन मंत्रिमंडळात दोन दिवसांपूर्वी सामील झालेल्या रझिया सुल्ताना यांना पाणीपुरवठा आणि स्वच्छता आणि महिला आणि बालविकासाचा कार्यभार देण्यात आला होता.

राजीनामा दिल्यानंतर रझिया सुल्ताना म्हणाल्या की, सिद्धू साहेब तत्त्वांचे पालन करणारा माणूस आहे. ते पंजाब आणि पंजाबियतसाठी लढत आहेत. दरम्यान, रझिया सुल्ताना या नवज्योतसिंग सिद्धू यांच्या निकटवर्तीय असल्याचे म्हटले जाते. तसेच, रझिया सुल्ताना यांचे पती मोहम्मद मुस्तफा हे नवज्योतसिंग सिद्धू यांचे प्रमुख धोरणात्मक सल्लागार आहेत, जे आयपीएस अधिकारी होते. अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये त्या परिवहन मंत्र्याची जबाबदारी सांभाळत होत्या.

मालेरकोटलाच्या आमदार रझिया सुल्ताना यांनी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांना आपला राजीनामा पाठविला आहे. यामध्ये म्हटले आहे की, मी रझिया सुल्ताना, पीपीसीसी अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू आणि राज्यभरातील लाखो काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत एकता म्हणून पंजाबच्या कॅबिनेट मंत्री पदाचा राजीनामा देत आहे. मी पंजाबच्या हितासाठी कार्यकर्ता म्हणून पक्षासाठी काम करत राहीन. माझ्या गरजेच्या वेळी माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर असंख्य आशीर्वाद दिल्याबद्दल मी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे मनापासून आभार मानते.

नवजोतसिंग सिद्धू यांनी मंगळवारी काँग्रेसच्या पंजाब प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात सिद्धू यांनी म्हटले आहे की, ते पक्षाची सेवा करत राहतील. नवजोतसिंग सिद्धू यांनी यावर्षी जुलैमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद स्वीकारले होते. नवजोतसिंग सिद्धू यांनी राजीनामा दिल्याने काँग्रेससाठी हा एक मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर पंजाबमध्ये आता राजीनाम्याचे सत्र सुरू झाल्याचे दिसते आहे. काही वेळापूर्वीच योगिंदर धिंग्रा यांनी पंजाब काँग्रेसच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला. तर पक्षाचे कोषाध्यक्ष गुलजार इंदर चहल यांनीही राजीनामा दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button