‘आर या पार’ची लढाई; कॅप्टन अमरिंदर सिंग राजीनामा देण्याच्या तयारीत
पंजाब काँग्रेसमध्ये वाढ भडकला; मुख्यमंत्र्यांचा सोनिया गांधींना निर्वाणीचा इशारा

चंदीगड: पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत वाद आता चांगलाच भडकण्याची शक्यता आहे. आतापर्यंत झाला तो अपमान बस झाला, यापुढे असा अपमान सहन करत काँग्रेसमध्ये राहू शकत नाही, असा निर्वाणीचा इशारा मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना दिला आहे. आज होणाऱ्या पक्षाच्या आमदारांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांची खदखद बाहेर पडली असून त्यांनी आता ‘आर या पार’ अशी भूमिका घेतली आहे. दरम्यान, पंजाब काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा उलथापालथ होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या विरोधात ४० आमदारांनी दंड थोपटल्यानंतर आज संध्याकाळी काँग्रेसने तातडीची बैठक बोलावली आहे. यात विधीमंडळ नेता निवडण्यात येणार आहे. या बैठकीला अमरिंदर सिंग जाणार नसून ते बैठकीपूर्वीच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पंजाबमध्ये आज होणारी आमदारांची बैठक ही मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासाठी अडचणीची ठरु शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या बैठकीला सर्व आमदारांनी हजर राहणं बंधनकारक आहे असा आदेश पक्षाकडून देण्यात आला आहे. जवळपास ४० हून अधिक नाराज आमदारांनी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना पदावरुन हटवावं अशी भूमिका घेत हायकमांडला पत्र लिहिलं आहे. त्यामुळे पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पंजाबच्या नेतृत्वात बदल करणार असल्याची चर्चा सुरु आहे. पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नवज्योतसिंह सिद्धू यांची नियुक्ती केल्यानंतर त्यांच्यातील आणि मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यातील वाद मिटण्याची आशा काँग्रेस हायकमांडला होती. पण तसं न होता हा वाद अधिक चिघळत गेला. पंजाब काँग्रेसमध्ये सुरु असलेला वाद आता भडकण्याची शक्यता आहे.
आज संध्याकाळी ५ वाजता चंदीगडच्या काँग्रेस भवनमध्ये ही बैठक होत आहे. या बैठकीला दिल्लीतून हरीश रावत, अजय माकन आणि हरीश चौधरी आज संध्याकाळी चंदीगडला पोहोचणार आहेत. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी माकन आणि चौधरी यांनी निरीक्षक म्हणून नियुक्त केलं आहे. आमदारांची बैठक होणार असल्याचं कळताच मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनीही आमदारांची बैठक बोलावली आहे. आमदारांच्या बैठकीत काँग्रेस हायकमांडकडून १८ सूत्री फॉर्म्युला मांडला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, सिद्धू समर्थकांची भाषा आणि एकूणच बॉडी लँग्वेज पाहता अमरिंदर सिंग यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
२०२२ मध्ये पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे पंजाबात राजकीय वातावरण गरम आहे. त्यात पंजाब काँग्रेसमध्ये दुफळी माजल्याचं चित्र आहे. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग विरूद्ध नवज्योतसिंग सिद्धू असे थेट दोन गट पडले आहेत. सिद्धू यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांना पक्षातच आव्हान दिलं आहे. त्यात प्रदेशाध्यक्ष म्हणून सिद्धू यांची वर्णी लावून काँग्रेस हायकमांडनेही सिद्धूच्या पारड्यात वजन टाकलं आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत नवज्योत सिद्धू हे काँग्रेसचा चेहरा असतील असं बोललं जात आहे.
हिंदू नेत्याकडे सूत्रे
दरम्यान, आज होणाऱ्या विधीमंडळ नेत्यांच्या बैठकीत पक्षातील हिंदू नेत्याची विधीमंडळ नेतेपदी निवड केली जाण्याची शक्यता आहे. त्यात सुनील जाखड आणि विजय इंद्र सिंगला यांच्या नावाची अधिक चर्चा आहे. तर नवज्योतसिंग सिद्धूही विधीमंडळ नेतेपदाच्या शर्यतीत असल्याचं सांगितलं जात आहे.
नेमका वाद काय?
पंजाबमध्ये एकीकडे विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी होत असताना, काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. पंजाब काँग्रेस दोन गटात विभागली आहे. एक गट नवज्योत सिद्धू यांचा तर दुसरा मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा आहे. अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रिपदावरुन हटवण्याची मागणी होत आहे. त्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अनेक आमदारांनी आवाज उठवला आहे. हे प्रकरण इतकं वाढलं आहे की, काँग्रेसच्या केंद्रीय समितीला हस्तक्षेप करावा लागला.
पंजाब काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण झाली आहे. त्यामुळे हायकमांडने या २५ आमदार आणि मंत्र्यांना दिल्लीत बोलावलं होतं. या सर्व आमदारांशी काँग्रेसच्या तीन सदस्यांच्या पॅनलने चर्चा केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील झाखड, मंत्री चरणजीत चन्नी, सुखजिंदर सिंग रंधवा आदींचा या बंडखोरांमध्ये समावेश आहे. निवडणुकीच्या काळात राज्यातील जनतेला काँग्रेसकडून आश्वासने देण्यात आली होती. या आश्वासनांची पूर्तता करण्यात आली नाही. त्यामुळे या आमदारांनी मुख्यमंत्र्यांना सवाल करण्यास सुरुवात केली. परिणामी मुख्यमंत्री आणि या आमदारांमध्ये तणाव निर्माण झाला.