जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध शिवसेनेच्या बड्या नेत्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

मुंबई : शिवसेना विरुद्ध जितेंद्र आव्हाड असा संघर्ष पुन्हा एकदा बघायला मिळतोय. शिवसेना आमदारांनी जितेंद्र आव्हाडांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे तक्रार केली आहे. जितेंद्र आव्हाडांच्या कार्यशैलीवर शिवसेना नेते, आमदार आणि मंत्री नाराज आहेत. यामध्ये उद्योगमंत्री सुभाष देसाई, माजी आमदार विनोद घोसाळकर,राहुल शेवाळे, सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. याआधी आमदार अजय चौधरी यांनीदेखील तक्रार केली होती.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि आमदारांनी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात तक्रार केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यपद्धतीबाबत शिवसेनेच्या नेत्यांकडून मुख्यमंत्र्यांकडे ही तक्रार करण्यात आली आहे. यापूर्वीही शिवडीचे आमदार अजय चौधरी यांनी आव्हाडांविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली होती. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी या तक्रारीची दखल घेत जितेंद्र आव्हाड यांनी टाटा रुग्णालयाला दिलेल्या सदनिकांच्या निर्णयाला स्थगिती दिली होती.
जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल जर सेनेच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली असेल. याबाबत आव्हाड आणि मुख्यमंत्र्यांची जर चर्चा होणार असेल तर काहीच चुकीचे नाही. तक्रार ही दुरुस्तीसाठीच असते. तीन पक्ष असल्यामुळे अशा छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात, या फार महत्वाच्या आहेत असे वाटत नाही. तिन्ही पक्ष एकसंघपणे राज्य चालवत आहेत, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केलंय.




