नवी दिल्ली : पंजाब काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली धुसपूस आज वेगळ्या वळणावर येऊन ठेपली आहे. कारण, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी अखेर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राज्यपालांची भेट घेऊन आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, अमरिंदर सिंग यांच्या विरोधात ४० आमदारांनी दंड थोपटल्यानंतर आज संध्याकाळी काँग्रेसने तातडीची बैठक बोलावली आहे. यात विधीमंडळ नेता निवडण्यात येणार आहे. या बैठकीपूर्वीच अमरिंदर सिंग यांनी अखेर आपला राजीनामा दिला आहे.
पंजाबमध्ये एकीकडे विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी होत असताना, काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. पंजाब काँग्रेस दोन गटात विभागली आहे. एक गट नवज्योत सिद्धू यांचा तर दुसरा कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा आहे. अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रिपदावरुन हटवण्याची मागणी केली जात होती. त्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अनेक आमदारांनी आवाज उठवण्यात आला होता. हे प्रकरण इतकं वाढलं होतं की काँग्रेसच्या केंद्रीय समितीला हस्तक्षेप करावा लागला.
Punjab CM Captain Amarinder Singh submits resignation to Governor Banwarilal Purohit, at Raj Bhavan in Chandigarh. pic.twitter.com/qIlYcr71L7
— ANI (@ANI) September 18, 2021
अमरिंदर सिंग राजीनामा देणार असल्याची चर्चा जोरदार रंगली होती. अमरिंदर सिंग यांनी राजनामा देणार नसल्याचे सांगितले होते. परंतु त्यांनी आता राजभवनावर जाऊन राज्यपालांकडे राजीनामा दिला आहे. अमरिंदर सिंग यांच्यासोबत त्यांचा मुलगाही उपस्थित होता. पंजाब काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण झाली आहे. त्यामुळे हायकमांडने या २५ आमदार आणि मंत्र्यांना दिल्लीत बोलावलं होतं. या सर्व आमदारांशी काँग्रेसच्या तीन सदस्यांच्या पॅनलने चर्चा केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील झाखड, मंत्री चरणजीत चन्नी, सुखजिंदर सिंह रंधवा आदींचा या बंडखोरांमध्ये समावेश आहे. निवडणुकीच्या काळात राज्यातील जनतेला काँग्रेसकडून आश्वासने देण्यात आली होती. या आश्वासनांची पूर्तता करण्यात आली नाही. त्यामुळे या आमदारांनी मुख्यमंत्र्यांना सवाल करण्यास सुरुवात केली होती. परिणामी मुख्यमंत्री आणि या आमदारांमध्ये तणाव निर्माण झाला होता. कदाचित याच कारणामुळे अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिला आहे.