शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळा; तीन तत्कालीन अधिकाऱ्यांना अटक
पुणे : पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेमधील तीन तत्कालीन अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. कर्ज प्रकरणासंदर्भात गुन्हे दाखल करण्यात आले असून या प्रकरणी वडगाव शेरी, औंध आणि कोथरुड येथील बँकेच्या तीन अधिकाऱ्यांना पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
वडगाव शेरीचे गोरख दोरागे, औंध शाखेचे प्रदीप निमण आणि कोथरुड शाखेचे नितीन बाठे अशी अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावं आहेत. बँकेच्या तीनही अधिकाऱ्यांनी कर्जदार आरोपींना आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून कर्ज मंजूर करण्यासाठी मदत केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. दरम्यान, आर्थिक अनियमिततेसह अन्य कारणांवरुन शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेने जून महिन्याच्या सुरुवातीलाच रद्द केला होता. ही बँक लिक्विडेशनमध्ये काढल्याचा आदेश रिझर्व्ह बँकेने जाहीर केला आहे. शिवाजीराव भोसले सहकारी बँकेने पैसे थकवल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. सहकार विभागाने केलेल्या शिफारसीनुसार ही कारवाई करण्यात आली.
शिवाजीराव भोसले सहकारी बँकेकडे पुरेसे भांडवल नाही. तसेच त्यांच्याकडे उत्पन्नाचे स्रोत नाहीत. त्यामुळे कायद्यानुसार ही बँक विविध निकषांची पूर्तता करु शकत नाही. यामुळेच बँक आपल्या ठेवीदारांना त्यांची संपूर्ण रक्कम परत करण्याच्या स्थितीत नाही. या पार्श्वभूमीवर ठेवीदारांच्या हिताच्या दृष्टीने बँकेला व्यवसाय सुरू ठेवण्याची परवानगी देता येत नाही. आर्थिक अनियमिततेसह इतर कारणांमुळे पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचा परवाना आरबीआयने रद्द केला.
या कारवाईमुळे बँकेतील ९८ टक्के ठेवीदारांना त्यांची व्याजासह जास्तीत जास्त पाच लाख रुपयांपर्यंत रक्कम परत मिळणार आहे. त्यासाठी त्यांनी ओळखपत्रांसह (केवायसी प्रक्रियेनुसार आवश्यक) आपला दावा सादर करावा, असे सांगितले जात आहे.
याआधी, शिवाजीराव भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांना बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. बँकेचे संचालक असलेले आमदार अनिल भोसले आणि सूर्याजी जाधव, सीईओ पडवळ, चीफ अकाऊंटंट शैलेश भोसले यांना अटक झाली होती. बँकेमार्फत बेनामी कर्जवाटप केल्याच्या आरोपाखाली पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आमदारासह चौघांना अटक केली होती.