पुण्यातील फॅशन स्ट्रीटला भीषण आग; तब्बल ८०० दुकानं खाक

पुणे : पुण्यातील कॅम्प परिसरातील फॅशन स्ट्रीट मार्केटमध्ये लागलेली भीषण आग तीन तासांनी आटोक्यात आली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र यात फॅशन स्ट्रीट मार्केटमधील तब्बल 800 दुकानं आगीच्या कचाट्यात सापडली आहे. तसेच या आगीमुळे व्यापारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
पुण्याच्या कॅम्प परिसरात असणाऱ्या फॅशन स्ट्रीट मार्केटमध्ये रात्रीच्या सुमारास भीषण आग झाली. ही आग कशामुळे लागली याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण या ठिकाणी कपड्याची मोठी दुकाने आणि गोदामं असल्याने ती आग पसरली.
या दुर्घटनेनंतर तत्काळ अग्निशमन दलाला याची माहिती देण्यात आली. त्यानंतर ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 16 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. फॅशन स्ट्रीटचा भाग अत्यंत अरुंद रस्त्यांचा असल्याने अग्निशमन दलाला ही आग विझवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, फॅशन स्ट्रीटचा परिसरात कपड्यांची अनेक दुकानं, गोदाम असल्याने त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान ही आग नेमकी कशी लागली? किती वाजता लागली? याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
ही आग मध्यरात्री 1 च्या सुमारास पूर्णपणे आटोक्यात आली. अग्निशमन दलाच्या 16 गाड्यांच्या मदतीने ही आग विझवण्यात आली आहे. तब्बल तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नसली तर जवळपास 800 दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले आहेत.