एकनाथ खडसे चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल
मुंबई : पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळ्याच्या चौकशीसाठी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. जावई गिरीश चौधरी यांच्या अटकेनंतर ईडीने खडसेंनाही समन्स बजावलं होतं. ईडीला संपूर्ण सहकार्य करणार असल्याचं खडसेंनी कार्यालयात प्रवेश करण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं होतं.
ईडी चौकशीच्या पार्श्वभूमीवर खडसेंनी आज पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी खडसे काहीतरी मोठा गौप्यस्फोट करणार, अशी चर्चा रंगली होती. मात्र त्याअगोदरच प्रकृती बिघडल्याच्या कारणास्तव त्यांची पत्रकार परिषद रद्द करण्यात आली होती. त्यानंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे खडसे ईडी चौकशीला जाणार की नाही, याबाबत तर्कवितर्क रंगले होते. परंतु सकाळी अकराच्या सुमारास ते अंमलबजावणी संचलनायच्या कार्यालयात दाखल झाले.
भोसरी येथील जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना मंगळवारी मध्यरात्री अटक करण्यात आली आहे. १३ तास कसून चौकशी केल्यानंतर ईडीने त्यांना बेड्या ठोकल्या, तर १२ जुलैपर्यंत त्यांची रवानगी ईडीच्या कोठडीत करण्यात आली आहे. त्याचवेळी खडसेंनाही अटक होण्याची शकत्या वर्तवण्यात येऊ लागली. जावयाच्या अटकेनंतर काही तास उलटत नाहीत तोपर्यंतच खडसे यांना देखील ईडीने समन्स बजावलं.
माझ्यावरील कारवायांमागे राजकीय सुडाचा वास
ईडीच्या चौकशीला जाण्यापूर्वी खडसेंनी पत्रकारांशी संवाद साधला. माझ्यावरील कारवायांमागे राजकीय सुडाचा वास आहे, मी भाजप सोडून राष्ट्रवादीत आल्यानेच माझ्यावर चौकशी सुरू आहे, असा आरोप खडसे यांनी केला आहे.
राजकीय हेतूने ही कारवाई सुरू आहे. नाथाभाऊंना छळण्यासाठीचं हे षडयंत्र सुरू आहे, असं सांगतानाच जळगावमध्ये व्हॉट्सअॅपवर भाजप कार्यकर्त्यांच्या ग्रुपवर ‘अभी कुछ होनेवाला है’ असा मेसेज फिरत आहे. यातून हे सर्व राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं दिसून येत आहे. पण मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे, असं खडसे म्हणाले.
ही जमीन एमआयडीसीची नाही. ती खासगी जमीन आहे. एमआयडीसीने हा भूखंड संपादित केलेला नाही. त्याचा मोबदला दिलेला नाही. ताबाही दिलेला नाही. आम्ही सर्व खासगी व्यवहार केले आहेत. मी भूखंड खरेदी केला तेव्हा त्यावर मूळ मालकाचं नाव होतं. हे मी वारंवार सांगितलं आहे. या प्रकरणी पाच वेळा चौकशी झाली. अँटी करप्शन ब्युरोनेही चौकशी केली. आरोपात काही तथ्य नसल्याचा अहवालही त्यांनी दिला आहे. अजून किती वेळा चौकशी करणार आहात?, असा सवाल त्यांनी केला.