‘पुलित्झर’ विजेते भारतीय वृत्तछायाचित्रकार दानिश सिद्दीकी यांची अफगाणिस्तानात हत्या
काबूल : प्रतिष्ठित समजला जाणाऱ्या पुलित्झर पुरस्कार विजेते भारतीय छायाचित्रकार दानिश सिद्दीकी यांचा गुरुवारी रात्री अफगाणिस्तानच्या कंदाहार येथे वृत्तांकन करताना चकमकीत हत्या झाली आहे.
अफगाणिस्तानमध्ये अफगाण सैन्यासोबत तालिबानविरोधी मोहिमेचे वृत्तांकन करत असताना झालेल्या चकमकीत सिद्दीकी यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे. दानिश सिद्दीक हे ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेचे दिल्ली ब्युरोतील मुख्य छायाचित्रकार पदावर कार्यरत होते. भारतात कोरोना या महारोगाची साथ पसरली असताना त्यांनी काढलेल्या छायाचित्रांतून कोरोना संकटाची दाहकता जगासमोर आली होती.
अफगाणिस्तानचे राजदूत फरीद ममुंडजे यांनी ट्विटरवरुन वृत्ताला दुजोरा दिला. काल रात्री कंदाहार येथे मित्र दानिश सिद्दीकीच्या हत्येच्या दु:खद बातमीने मनापासून दु:ख झाले. दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर भारतीय पत्रकार आणि पुलित्झर पुरस्कार विजेता दानिश अफगाण सुरक्षा दलासोबत होते, त्यावेळी दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला, असे त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.