मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेसमोर आले. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्य मुंबईकरांना मोठी भेट दिली आहे. मुंबईकरांच्या ५०० चौ.फुटापर्यंतच्या घरावरील मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला आहे. तसेच या निणर्याची तत्काळ अंमलबजावणी करा अशा सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या. मुंबई’कर’ म्हटल्यावर मुंबईकरांनी काय फक्त करच भरायचे का? मुंबईकरांना सेवा देखील तितक्याच चांगल्या मिळाल्या पाहिजेत या उद्देशातून आणि शिवसेनेनं वचननाम्यात दिलेल्या आश्वासनाप्रमाणे हा निर्णय घेतला आहे, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली. मुंबईतील ५०० चौरस फुटांखालील घरांवरील मालमत्ता कर माफ करण्याच्या निर्णयाला अखेर आजच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आणि निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करण्याचेही आदेश प्रशासनाला दिले असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विविध मुद्द्यांवर देखील भाष्य केलं.
CM Uddhav Balasaheb Thackeray addressing the State https://t.co/iTiVPFcC5F
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 22, 2020
जनतेला खोटी वचनं द्यायची नाहीत असे संस्कार शिवसैनिकावर आहेत. निवडणुकीआधी शिवसेनेच्या वचननाम्यात मुंबईकरांना ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करणार असं आश्वासन दिलं होतं. ते आज पूर्ण करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. १९६६ पासून जन्माला आलेली शिवसेना मुंबईकरांच्या आशीर्वादाने मुंबई सांभाळतेय. आमची ही चौथी पिढी, आजोबा,वडील, मी आणि आता आदित्य. काम म्हणून नाही, कर्तव्य म्हणून नाही तर मुंबईवरचं प्रेम आम्ही पुढे नेत आहोत. शिवसेनाप्रमुख स्वत: जाऊन कामाची पहाणी करत. मी ही नालेसफाई, दहिसर नदीचे काम असेल किंवा सौंदर्यीकरणाचे काम असेल ते जाऊन पहात होतो आता हे काम आदित्य करत आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 1, 2022
जे बोलतो ते करतो, केवळ तोंडातून वाफा काढत नाही
यावेळी मुख्यमंत्र्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करत विरोधकांना चांगलेच सुनावले आहे. आम्ही जे बोलतो, ते करतो. केवळ तोंडातून वाफा काढत नाही, असा टोला विरोधकांना लगावला.सन २०१७ मध्ये शिवसेनेने वचननामा दिला होता. त्यातील अनेक वचने पूर्ण केली आहेत. पण मुंबईकरांसाठी ५०० फूटांपर्यंत मालमत्ता कर रद्द करण्याचे वचन विचारपूर्वक दिले होते. ५०० चौ. फुटापर्यंतच्या घराच्या मालमत्ताकर माफ करणे हे महत्वाचे वचन आपण पूर्ण करत आहोत. हा निर्णय घेण्यासाठी ज्यांनी सहकार्य केले त्यांना सर्वांना मुंबईकरांच्यावतीने धन्यवाद देतो. अनेक जण येतात आणि असे बोलायचे असते, असे बोलून जातात. आम्ही तोंडातून वाफा काढत नाही. जे बोलतो ते करतो. मी मुंबईकरांना वचन देतो तुमच्या आरोग्याची आणि सर्व गोष्टींची काळजी घेण्यासाठी आम्ही समर्थ आहोत, या शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना सुनावले. जनतेच्या कष्टातून सगळी कामे होत असतात. आपण ते काम केले आणि त्याची मोठी जाहिरात करायची ते मला स्वतःला पटत नाही, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नमूद केले.
माझा ताण आदित्य ठाकरेंनी कमी केला
शिवसेना प्रमुखांनी सुरु केलेले काम आज आम्ही पुढे नेत आहोत. मी सुद्धा नालेसफाईचे काम नाल्यामध्ये उतरून पाहिले आहे. आता माझा ताण आदित्य ठाकरेंनी कमी केला आहे. मतदानापूर्वी तारे तोडून आणण्याची भाषा करणारे नंतर पाच वर्षे काहीच बोलत नाहीत. शिवसेना हे असे अजिबात करत नाहीत. आता नवीन मित्र सोबत आले आहेत. तिघे मिळून आपण पुढे जात आहोत. इतर पक्ष आम्ही हे करु असे म्हणतात आणि कालांतराने तेही विसरतात आणि लोकसुद्धा विसरतात. खोटे बोलायचे नाही आणि जे जमणार असेल तेच वचन द्यायचे, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
थांबायचं नाही, पण सतर्क आणि सावध राहायला हवं
तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांनी ट्विटरद्वारे जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. ‘थांबायचं नाही. पण सतर्क आणि सावध राहायला हवं. कितीही आव्हानं येऊ देत. त्यावर आपण मात करूया. नव्या वर्षात हीच हिंमत बांधुया. आरोग्यदायी, समृद्ध महाराष्ट्र आणि बलशाली भारत घडवण्यासाठी एकजूट होऊया’, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
भाजपवर टीका
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला नवीन वर्षानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. पाठीच्या मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बऱ्याच दिवसांपासून माध्यमांसमोर किंवा जनतेसमोर आले नाहीत. नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनातही मुख्यमंत्री अनुपस्थित राहिले. त्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीकाही केली. आता मोठ्या कालावधीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे समोर आले. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी जनतेला नव वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. तसंच यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर जोरदार निशाणाही साधलाय.
राजकारण म्हटल्यावर आपण काही केलं तर भ्रष्टाचार केला, नाही केलं तर यांनी काहीच केलं नाही. मग शेवटी आपली टिमकी आपल्यालाच वाजवावी लागते की आम्ही हे केलं, आम्ही ते केलं. आम्ही हे करु, आम्ही ते करु आणि यालाच तर राजकारण म्हणतात. अनेकजण असे आहेत की वाटेल ते सांगतात. आम्ही तुमच्यासाठी तारे तोडून आणू, आम्ही तुमच्यासाठी चंद्रावर उड्डाणपूल बांधून देऊ. या काही गोष्टी होण्यातल्या नसतात त्या सांगतात आणि लोक फसतात आणि मतं देऊन मोकळी होतात. मग पाच वर्षे काही बोलायचं नाही. मग पुढच्या वर्षी अहो तुम्ही बोलला होतात की, तुमच्यासाठी तारे तोडून आणू, मग लोकं बऱ्याचदा त्यांनाच तारे दाखवतात. तर अशा गोष्टी आपण कधी केल्या नाहीत आणि करणारही नाहीत’, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी भाजपला चिमटा काढला.