शिवसेना घाबणार नाही; यशवंत जाधवप्रकरणी महापौर किशोरी पेडणेकरांची भाजपवर टीका
किरीट सोमय्या यांच्यावरही निशाणा
मुंबई: मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागाने छापा टाकला. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयकर विभागाने हा छापा टाकल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजपवर जोरदार टीका केली आहे. यशवंत जाधव या छाप्याला हवी ती उत्तरे देतील, असे पेडणेकर यांनी म्हटले आहे.
प्राप्तिकर विभागाचा छापा पहिल्यांदा पडत आहे, अशातला भाग नाही. त्यांना जी माहिती हवी आहे ती स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव हे नक्की देतील. शिवसैनिकांनी अनुचित प्रकार करू नये म्हणून या ठिकाणी आले, असे पेडणेकर यांनी स्पष्ट केले.
तुम्ही ज्या पद्धतीने यंत्रणांचा वापर करत आहात ते मुंबई आणि महाराष्ट्र बघत आहे. जिथे भाजपची सत्ता नाही तिथे हा त्रास होत आहे. हा त्रास होत आहे म्हणून आम्ही घरात घाबरुन बसणार नाही. जे आहे ते तुम्हाला दाखवू. हे सर्व दुधाने धुतलेले आहेत आणि शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एवढेच बरबटलेले आहेत हे त्यांचे म्हणणे आहे. आम्ही कायदा मानतो आणि त्यानुसार ही पाहणी आहे. यशवंत जाधव याला उत्तर देतील. त्यामुळे उगाचच वातावरण बिघडू नका, असेही पेडणेकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, सगळे स्पष्ट होऊन आपल्या समोर येणार आहे. त्याआधीच लंकेला आग लावावी तसे हे सगळे बोंबलत चालले आहेत. या यंत्रणा दोन्ही बाजूने वापरता येतात. निवडणुकीच्या तोंडावर आणि सत्ता गेल्यापासून बुडाला आग लागली आहे, हे महाराष्ट्र आणि मुंबई बघत आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी कुठलाही अनुचित प्रकार करु नका. आधी शिवसैनिक असलेल्या छगन भुजबळांनाही चिवटपणे लढा दिला. त्यांना दोन वर्षे मनस्ताप भोगावा लागला. पण नंतर त्याच न्यायालयाने त्यांना क्लीन चीट दिली, अशी टीका किशोरी पेडणेकर यांनी भाजपवर केली.
किरीट सोमय्या यांच्यावरही निशाणा
किरीट सोमय्या यांनीच मला फ्लॅट द्यावेत असा उपरोधिक टोला महापौर किशोरी पेडणेकर यांनी लगावला आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांनी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील सदनिका हडप केल्याचा आरोप केला होता. त्या आरोपांबाबत बोलताना पेडणेकर यांनी सोमय्या यांना टोला लगावला.
महापौर किशोरी पेडणेकर यांनी किरीट सोमय्या यांनी त्यांच्याकडे असलेले फ्लॅट मला द्यावेत असे म्हटले. भावाकडून बहिणीला भेट दिली जाते. त्याप्रमाणेच किरीट भावाने मला त्याच्याकडील प्लॅट मला द्यावे असे म्हणत महापौरांनी आरोप फेटाळले.
किरीट सोमय्या यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी म्हटले की, यशवंत जाधव बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून खूप मोठे रॅकेट चालवत होते. मी काल महाविकास आघाडीच्या डर्टी डझन नेत्यांची नावे जाहीर केली होती. त्यावेळी मी काही नावं विसरला होतो. यामध्ये आता यशवंत जाधव, यामिनी जाधव आणि किशोरी पेडणेकर यांचा समावेश झाला आहे. किशोरी पेडणेकरांनी एसआरए सदनिका हडप केली असल्याचा आरोप केला.