मुंबई : ‘मी मोदीना मारू शकतो आणि शिव्या देऊ शकतो’ असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केल्यामुळे भाजप प्रचंड आक्रमक झाली आहे. आज दिवसभरात राज्यात आंदोलन करण्यात आले. आता मुद्याची लढाई गुद्यावर आली आहे. ‘नाना पटोलेंची जीभ छाटा १ लाख मिळवा’ अशी घोषणाच जालन्यातील भाजपच्या युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष सुजित जोगस यांनी केली आहे. त्यामुळे काँग्रेसही आक्रमक झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात केलेल्या वादग्रस्त विधानानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात जालना भाजप युमो चांगलीच आक्रमक झाली आहे. जिल्हाध्यक्ष प्रा. सुजित जोगस यांनी तर चक्क नाना पटोलेंची जीभ छाटून आणा आणि १ लाख रुपये बक्षीस मिळवा, अशी घोषणा आहे. जोगस यांनी जालना पोलीस ठाण्यात नाना पटोले यांच्याविरोधात तक्रार देखील दिली आहे.
अनिल बोडेंनी दिली हात छाटण्याची धमकी
दुसरीकडे, नाना पटोले यांचा पंजा छाटणार अशी भाषा करणाऱ्या अनिल बोंडे यांना तत्काळ अटक करा, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते दिलीप एडतकर यांनी केली आहे. ‘नानांनी लक्षात ठेवाव शाहिस्ते खानाची नुसती बोटच छाटली होती तुझा पंजाच छाटलाच जाईल. उगीचच गमच्या मारू नको अमरावतीवरून पोरं निघाले आहेत पंजा सांभाळून ठेवावा, असे वक्तव्य माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी केलं होतं.
‘सोनियांना गांधी यांना खुष करण्यासाठी मोदींवर किती भुंकायचे याची शर्यत काँग्रेसमध्ये लागली आहे. नानाने तर हद्दच केली आहे. मी मालकीनचा सगळ्यात प्रामानिक कुत्रा आहे म्हणून दाखविण्यासाठी भुंकण्यासोबतच चावण्याचाही धमकी दिली, असंही अनिल बोंडे म्हणाले होते.
बोंडे यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसकडून पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली असून अनिल बोंडे यांनी पाठवलेली पोर कुठपर्यंत आहे त्यांचा शोध पोलिसांनी घेतला पाहिजे त्यापूर्वी अनिल बोंडे यांना पोलिसांनी अटक करावी, अशी मागणी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रवक्ते दिलीप एडतकर यांनी केली.
त्यांना जर अटक झाली नाही आणि नाना पटोले यांना जर काही धोका झाला तर येथील पोलीस त्यांला जबाबदार असतील, नाना पटोले यांनी फक्त मोदींचा उल्लेख केला आहे त्यांनी नरेंद्र मोदी असा उल्लेख कुठेही केलेला नाही त्यामुळे भाजपने हे स्वतःच्या अंगावर घेवू नये, पोलिसांनी तत्काळ अनिल बोंडे यांना अटक करावी, अशी मागणी काँग्रेसकडून अमरावती येथे करण्यात आली आहे.
पटोलेंच्या विधानाचा अप्रचार करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करा; काँग्रेसची मागणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा दुरुपयोग करून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबद्दल अपशब्द बोलून खोटा प्रचार करणाऱ्या व त्यांचा पुतळा जळणाऱ्या वसई विरार भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करून योग्य ती कार्यवाही करावी अशा मागणीचे निवेदन वसई विरार जिल्हा काँग्रेसच्या वतीने वसई विरार पोलिस आयुक्तालयातर्फे वसई विरारमधील तुळींज, पेल्हार आदी विविध पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना देण्यात आले अशी माहिती वसई विरार शहर जिल्हाध्यक्ष ओनिल आल्मेडा यांनी दिली.
या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रांताध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले यांनी भंडारा जिल्ह्यातील स्थानिक गाव गुंडाविरुद्ध केलेल्या वक्तव्याचा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संबंध जोडून भाजपच्या लोकांनी पंतप्रधान पदाचा अपमान केला आहे. अशा खोट्या बातम्या, खोटा प्रचार, प्रसार करणाऱ्या भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावर कडक कारवाई करावी. तसेच अशा लोकांनी सोशल मीडियावर केलेल्या खोट्या अपप्रचाराची गंभीर दखल घेऊन कारवाई करावी. तसेच सोमवार दि. १७ जानेवारी २०२२ रोजी वसई विरार शहर जिल्हा भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज बारोट व भाजपचे पदाधिकारी व समर्थक यांनी नालासोपारा पूर्वेला राधाकृष्ण हॉटेल परिसरात काँग्रेस नेते व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले यांचा पुतळा जाळला आहे. प्रसार माध्यमातून याचे चित्रण व बातम्या प्रसारित झाल्या आहेत. याची गंभीर दखल घेऊन सर्व संबधितांवर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी असेही शेवटी निवेदनात म्हटले होते.