नवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लढत देण्यासाठी पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी यांना पक्षाचा चेहरा बनविण्याचा निर्णय घेतला आहे.
काँग्रेस स्वबळावर प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवेल. प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्ष या वेळी उत्तर प्रदेशमध्ये सत्तेत परत येईल, असा दावा काँग्रेसचे नेते अखिलेश प्रताप सिंह यांनी केला.
येत्या निवडणुकीत पक्षाची घोषणा असेल ‘सबको देखा बार बार, अबकी बार काँग्रेस सरकार.’ पक्षाच्या सूत्रांनुसार काँग्रेस निवडणुकीत ब्राह्मण कार्ड खेळण्याची तयारी करीत आहे. योगी सरकारवर नाराज असलेल्या ब्राह्मण मतदारांना एकत्र आणण्यासाठी प्रियंका गांधी वरिष्ठ नेते प्रमोद तिवारी, राजेश त्रिपाठी आणि आचार्य प्रमोद कृष्णन या ब्राह्मणांना महत्त्वाची जबाबदारी देण्याची योजना बनवत आहे.
यामुळे काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या जितीन प्रसाद यांची ब्राह्मण चेहऱ्यांनी कोंडी करता येईल. भाजप हिंदुत्व व आणि राम मंदिर कार्यक्रमावर ही निवडणूक लढणार हे स्पष्ट असल्याने साधुविरोधात साधू या लढाईसाठी प्रमोद कृष्णन यांना काँग्रेस पुढे करील. समाजवादी पक्षाच्या अल्पसंख्याक मतपेटीवरही काँग्रेस पकड बळकट करण्याच्या प्रयत्नांत आहे, असे सूत्रांकडून समजते.