मुंबई महापालिकेकडून खासगी रुग्णालयांना मिळणार काळ्या बुरशीवरील इंजेक्शन

मुंबई : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच म्युकरमायकोसिस आजाराने सर्वांची चिंता वाढवली. त्यातच म्युकरमायकोसिस आजारावर प्रभावी असलेल्या औषधांचाही तुटवडाही निर्माण झाल्याने चिंतेत आणखी भर पडली होती. मुंबईतील खासगी रुग्णालयातही म्युकरमायकोसिसच्या अनेक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. हे सर्व लक्षात घेता मुंबई महानगरपालिकेने आता खासगी रुग्णालयांना ब्लॅक फंगस म्हणजेच काळ्या बुरशीवरील अॅफोटेरिसीन बी इंजेक्शन पुरवण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई महानगरपालिका प्रथमच अशाप्रकारे एखादं औषध खासगी रुग्णालयांना देत आहे. रुग्णांचा जीव वाचणं महत्वाचं आहे आणि त्यासाठी मुंबई मनपाने हा निर्णय घेतला आहे. यानुसार आता काळ्या बुरशीवर प्रभावी असलेलं लायपोझोमल अॅफोटेरिसीन बी इंजेक्शन मुंबई महानगरपालिका खासगी रुग्णालयांना देणार आहे. मात्र, त्यासाठी रुग्णालयांना आपल्या रुग्णांची माहिती महानगरपालिकेच्या एपीड सेलकडे द्यावी लागणार आहे. हे औषध थेट रुग्णांना देण्यात येणार नाहीये तर रुग्णालयांनी आपल्याकडे दाखल असलेल्या रुग्णांच्या बाबतची माहिती पालिकेच्या एपीड सेलकडे दिल्यावर पालिका त्या रुग्णालयाला औषध पुरवठा करणार आहे अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे. खासगी रुग्णालयांनी आपल्याकडील म्युकरमाकोसिसच्या रुग्णांची माहिती मुंबई पालिकेला दिल्यावर दोन-दोन दिवसांचे इंजेक्शन या प्रमाणात बीएमसी खासगी रुग्णालयांना याचा पुरवठा करणार आहे.




