गंगेच्या तीरावर मृतदेहांचे दफन सुरूच; मृतदेहांची मोजदादही अशक्य

लखनऊ: उत्तर प्रदेशातील कोरोना बळींची संख्या काही थांबताना दिसत नाही. कोरोनामुळे रुग्णांचा मृत्यू होत असल्याने मृतदेह जाळायला स्मशानभूमीही कमी पडू लागली आहे. त्यामुळे नागरिकांनी गंगेच्या काठावरच मृतदेह दफन करायला सुरुवात केली आहे. सरकारने मनाई केल्यानंतरही लोक गंगेच्या काठावर मृतदेह पुरत आहेत. त्यामुळे पाहावं तिकडे मृतदेहच मृतदेह दिसत असून त्यांची मोजदाद करणंही शक्य झालं आहे.
गंगेच्या काठावर मृतदेह दफन केले जात असल्याचे आणि गंगेत मृतदेह सोडल्या जात असल्याचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाल्याने देशभरात संतापाची भावना निर्माण झाली होती. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारवर टीकाही होत होती. देशभरात नाचक्की झाल्याने उत्तर प्रदेश सरकारने गंगा नदीकाठी मृतदेहांचे दफन करण्यास मनाई केली होती. मृतदेह दफन केल्यास किंवा नदीत सोडल्यास कारवाईचा इशारा देतानाच या ठिकाणी पोलीस पेट्रोलिंगही करण्यात आली होती. मात्र सरकारचे सर्व प्रयत्न फोल ठरताना दिसत आहेत. प्रयागराजच्या श्रृंगवेश्वर धामजवळ मृतदेहांना दफन करण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे घाटावर सर्वत्र प्रेतच दिसून येत आहेत. पोलीसही हा सर्व प्रकार मूकदर्शक बघून बघत असून कोणीही मृतदेह दफन करणाऱ्यांना रोखत नाहीये.
घाटावर मोठ्या प्रमाणावर मृतदेह दफन केले जात आहे. ही संख्या प्रचंड मोठी आहे. एवढेच नव्हे तर मृतदेहांशेजारी झेंडेही लावले जात आहेत. तसेच मृतदेहाशेजारीच अर्थीचं सामानही ठेवलं जात आहे. त्यामुळे गंगा नदीमध्ये प्रचंड कचरा झाला आहे. कोरोना महामारीमुळे मोठ्या संख्येने गंगा किनारी मृतदेह येत आहेत. पूर्वी एका दिवसाला ८ ते १० मृतदेह येत होते. आता दिवसाला ६० ते ७० मृतदेह येत आहेत. कधी कधी हा आकडा शंभरच्यावरही जात आहे. प्रशासनाच्या मनाईनंतरही लोक मृतदेह घेऊन येत आहेत, असं येथील पंडितांचं म्हणणं आहे.
मृतदेह दफन करण्याची फार जुनी परंपरा आहे. शैव संप्रदायात मृतदेह दफन केले जातात. मृतदेह दफन करण्यापासून रोखू शकत नाही. कारण त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या जातात, असं घाटावरील एका पंडिताने सांगितलं. जे लोक गरीब असतात, ज्यांच्याकडे अंत्यसंस्कार करण्यासाठी पैसे नसतात, ते लोक मृतदेह दफन करत असतात. आता कोरोनामुळे अनेक लोक हेच करत आहेत. या काळात पूर्वीपेक्षा अधिक मृतदेह दफन केले जात आहेत. स्नान घाटापर्यंत मृतदेह दफन केले जात आहे, असं श्रृंगवेश्वर घाटाच्या एका पुरोहिताने सांगितलं.



