राजकारण

संजय राऊतांनी फडणवीसांपेक्षा शिवसेनेची चिंता करावी : प्रवीण दरेकर

मुंबई: मराठा आरक्षण आणि ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून गेल्या काही दिवसांपासून भाजप चांगलाच आक्रमक झाला आहे. ओबीसींना राजकीय आरक्षण मिळवून दिले नाही, तर राजकीय संन्यास घेईन, असे मोठे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. यावरून आता राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांचे भविष्य उज्ज्वल असून, त्यांना संन्यास घेऊ देणार नाही, असे म्हटले आहे. यावर, संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांची चिंता करण्यापेक्षा शिवसेनेची करावी, असा टोला भाजपकडून लगावण्यात आला आहे.

फडणवीस लढवय्ये नेते आहेत. त्यांना संन्यास घेऊ देणार नाही. त्यांची महाराष्ट्र, देशाला गरज आहे. अशी भाषा त्यांना शोभत नाही. चांगल्या नेतृत्त्वाचा राजकारणात तुटवडा आहे. देवेंद्र फडणवीसांसारख्या हरहुन्नरी नेत्यांने फकीर होण्याची भाषा करणे योग्य नाही. संन्यास वगैरे घेण्याची भाषा करू नका, त्यासाठी मी त्यांना स्वत: भेटून सांगेन, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. यावर, आता भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांची चिंता करण्यापेक्षा शिवसेनेची चिंता करावी. अलीकडच्या काळात संजय राऊत शिवसेनेची चिंता करण्यापेक्षा राष्ट्रवादीची चिंता जास्त करताना दिसत आहेत. यामुळे शिवसेनेत नाराजी आणि अस्वस्थता आहे. शिवसेनेची चिंता केली, तर शिवसैनिक त्यांना धन्यवाद देतील, असा टोला दरेकर यांनी लगावला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button