हिंदू आहात, सेक्युलर की मधले? नितेश राणेंचा शिवसेनेला बोचरा सवाल
आदित्य ठाकरेंना पाहताच नितेश राणेंनी केलं 'म्याव.. म्याव...'

मुंबई : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजप आ. नितेश राणे आमने-सामने आले आहेत. दरम्यान, आज अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी नितेश राणेंनी शिवसेनेला हिंदुत्व आणि आदित्य ठाकरे यांना आलेल्या धमकीवरून डिवचले. शिवसेना ही हिंदुत्ववादी आहे, सेक्युलर आहे की मधली आहे, हे शिवसेनेने स्पष्ट असा बोचरा सवाल नितेश राणेंनी विचारला. तसेच आदित्य ठाकरेंना नेमकी कुठल्या आवाजात धमकी आली, असा टोलाही त्यांनी लगावला.
शिवसेनेला लक्ष्य करताना नितेश राणे म्हणाले की, पहिलं शिवसेनेनं ठरवावं की ते हिंदुत्वाच्या बाजूने आहेत की, ते सेक्युलॅरिझमच्या बाजूने आहेत. कधी त्यांना सेक्युलॅरिझम पाहिजे असतो. कधी त्यांना धर्मनिरपेक्ष बनायचं असतं. तर कधी ते हिंदुत्वाच्या मागे जातात. अशा दोन्ही बाजूला लटकणाऱ्या लोकांना, मधल्या लोकांना समाजात काय म्हणतात याबाबत जरा विचार करा. शिवसेनेची भूमिका नेमकी कोणती याबाबत शिवसेनेनं, सामनाने भूमिका स्पष्ट करावी. बाकी मधले असतील तर त्यांचं काय करायचं ते आम्ही बघू, असा टोला निेश राणेंनी लगावला.
यावेळी आम्ही हिंदुत्वाच्या झेंडा घेऊन उभे आहोत, या शिवसेनेच्या विधानावरूनही नितेश राणेंनी टोला लगावला. ते म्हणाले की, शिवसेनेमध्ये हिंमत असेल तर त्यांनी हे विधान सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या तोंडावर जाऊन म्हणावं. जेव्हा शिवसेना असं विधान राहुल गांधी, सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या समोर म्हणून दाखवेल, तेव्हा आम्ही त्यांना मानू. बाकी सामनाच्या ऑफिसमधलं हिंदुत्व आम्हाला नको आहे, असेही नितेश राणे म्हणाले.
दरम्यान, आज आदित्य ठाकरे यांना आलेल्या धमकीवरूनही नितेश राणेंनी शिवसेनेवर निशाणा साधला. आदित्य ठाकरेंना नेमकी कुठल्या आवाजात धमकी दिली हे विचारा. धमकी देण्यासारखं आदित्य ठाकरे नेमकं करतात काय? त्यांनी ७ आणि ८ वाजल्यानंतरच्या बैठका कमी कराव्यात, म्हणजे धमक्या कमी होतील, असा टोलाही नितेश राणेंनी लगावला.
आदित्य ठाकरेंना पाहताच नितेश राणेंनी केलं ‘म्याव.. म्याव…’
अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवातही विरोधकांनी पायऱ्यावर बसून केली. राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे दुसऱ्या दिवशी सभागृहात जात असताना आमदार नितेश राणे हे विधानसभेच्या पायऱ्यावर इतर भाजप सदस्यांसमेवत बसले होते. त्यावेळी, नेमकं आदित्य ठाकरे पायरी चढून वर जात असताना, नितेश राणेंनी त्यांच्याकडे पाहून ‘म्याव, म्याव…’ असा आवाज काढला. नितेश राणेंच्या या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियातून समोर आला आहे.
आमदार नितेश राणे हे सातत्याने शिवसेना आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना लक्ष्य करत असतात. ट्विटरच्या माध्यमातूनही ते मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरेंवर टीका करतात. त्यातच, शिवसेना नेत्यांनाही त्यांच्याकडून सातत्याने टार्गेट केलं जातं. नितेश राणे यांनी यापूर्वीही दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरुन आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला होता. दिशा सॅलियन प्रकरणात आदित्य ठाकरेंच्या नावाचा उल्लेख झाला होता. मुंबई पोलीस त्यांना चौकशीसाठी बोलावणार आहेत का? कायदा सर्वांसाठी समान असतो, असा प्रश्न त्यांनी विचारला होता.
दरम्यान, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नितेश राणेंनी आमदार भास्कर जाधव यांना सोंगाड्या म्हटले आहे. भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केली होती. विधानसभा सभागृहात त्यांनी मोदींची नक्कल केल्यामुळे विरोधक आक्रमक झाले होते. त्यानतंर, जाधव यांनी बिनशर्त माफी मागितली आहे. याच नक्कल घटनेवरुन नितेश राणेंनी भास्कर जाधव यांना सोंगाड्या असे संबोधले.




