प्रशांत किशोरचे सहकारी त्रिपुराच्या हॉटेलमध्ये ‘नजरकैदेत’
आगरतळा : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांची कंपनी आयपॅकचे २० ते २२ कर्मचारी त्रिपुरामध्ये गेले आहेत. त्रिपुरामध्ये तृणमूल काँग्रेससाठी राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी किशोर यांची टीम गेली आहे. आगरतळातील एका हॉटलमध्ये हे सदस्य उतरले असताना पोलिसांनी त्यांना बाहेर जाण्यास मनाई केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
या टीमचे हे सदस्य गेल्या काही दिवसांपासून त्रिपुरामध्ये तृणमूल काँग्रेससाठी शक्यता आणि जमिनीवरील परिस्थिती याचा शोध घेण्यासाठी गुप्तपणे फिरत आहेत. हॉटेल वुडलँडमध्ये हे कर्मचारी राहिले आहेत. पोलिसांना याची कोणीतरी खबर दिली आणि प्रशासनाने सुत्रे हलवत या कर्मचाऱ्यांना हॉटेलमधून बाहेर पडण्यास बंदी घातली आहे. कोरोना प्रोटोक़ॉलचे कारण देण्यात आले आहे. कोरोनाचे नियम पाळत नसल्याने त्यांना हॉटेलमधून बाहेर जाण्यावर बंदी घालण्यात आल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
त्रिपुरामध्ये २०२३ मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. आगरतळाच्या पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली असून रिपोर्टची वाट पाहत आहोत. त्यांनी कोणताही आरटीपीसीआर रिपोर्ट सादर केलेला नाही.
दुसरीकडे तृणमूल काँग्रेसचे त्रिपुरा अध्यक्ष आशिष लाल सिंह यांनी हा लोकशाहीवरील हल्ला असल्याचा आरोप केला हे. आयपॅकची टीम इथे सर्व्हेक्षणासाठी आली होती. राज्य सरकारने त्यांना नजरकैदेत ठेवले आहे. कारण ते त्यांच्या सर्व्हेक्षणाच्या निकालांना घाबरत आहेत. त्रिपुराची ही संस्कृती नाही. दरम्यान, भाजपाने यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आयपॅकच्या सदस्यांनी आपल्य़ाला पोलिसांनी कोणतेही कारण दिले नसल्याचा आरोप केला आहे.