राजकारण

शरद पवारांचा हा काही पहिलाच प्रयत्न नाही : नाना पटोले

दिल्लीतील राजकीय घडामोडींवर काँग्रेसची प्रतिक्रिया

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मंगळवारी १५ विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेणार असल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीत राष्ट्रमंच या बॅनरखाली एकत्र येण्यावर चर्चा होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या बैठकीवर बोलताना शरद पवार यांचा हा अशा प्रकारचा पहिलाच प्रयत्न नसल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलीय.

शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी उद्या दुपारी ४ वाजता ही बैठक होणार आहे. महत्वाची बाब म्हणजे या बैठकील काँग्रेस सहभागी होण्याची शक्यता कमी आहे. दरम्यान, शरद पवार राजधानी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपविरोधात १५ विरोधी पक्षांची मोट बांधत असल्याबाबत पटोलेंना पत्रकारांनी विचारलं. त्यावेळी पवार साहेबांचा हा काही पहिला प्रयत्न नाही. ज्या ज्या वेळी राजकीय समीकरण बदलतात, राजकारणात वेगळे वारे वाहू लागतात तेव्हा पवारांनी अशा भूमिका घेतलेल्या आहेत. त्यामुळे यात काही नवीन आहे असं म्हणणं चुकीचं असल्याचं पटोले यांनी म्हटलंय.

आमचा पक्ष वाढवायचा असेल तर शिवसेनेला त्रास का?

स्वबळाचा नारा केवळ काँग्रेसनंच नाही तर शिवसेनेनंही दिला आहे. पण फक्त काँग्रेसला टार्गेट करण्याचं काम सुरु आहे. मी सामना वाचत नाही. आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा असेल तर कुणाला त्रास का व्हावा? कुणी आमच्यावर टीका करत असेल तर आम्ही त्याला महत्व देत नाही, असे पटोले यांनी म्हटले आहे.

आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा असेल तर कुणाला त्रास का व्हावा? कुणी आमच्यावर टीका करत असेल तर आम्ही त्याला महत्व देत नाही. आम्ही जयंत पाटील यांनाही शुभेच्छा देतो की, त्यांनी शिवसेनेसोबत युती जाहीर करुन टाकावी, अशा शब्दात नाना पटोले यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्युत्तर दिलंय.

प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राबाबतही पटोले यांना विचारण्यात आलं. त्यावेळी भाजपसोबत आघाडी करावी, असं सरनाईक यांनी म्हटलंय. त्यामागील मुख्य कारण केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा असल्याचं पटोले म्हणाले. भाजप केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून कधी शिवसेना तर कधी राष्ट्रवादीच्या नेत्यांना त्रास देत असल्याचं आम्ही पाहतोय. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरु आहे, त्याचा काँग्रेस निषेध करतेय, असंही पटोले म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button