प्रशांत किशोर यांचा निवडणूक व्यवस्थापन कामातून संन्यास
नवी दिल्ली : आपल्या कारकीर्दीत पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील मोठा विजय मिळविल्यानंतर निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी सगळ्यांनाच जोरदार धक्का दिला आहे. प्रशांत किशोर यांनी निवडणूक व्यवस्थापनातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली. “मी जे आता करत आहे ते यापुढे करण्याची इच्छा नाही. मी खूप काम केलं. आता ब्रेक घेऊन आयुष्यात वेगळं काहीतरी करण्याची वेळ आली आहे. मला निवडणूक रणनीतीकार कामाचा संन्यास घ्यायचा आहे,” असं ते म्हणाले.
राजकारणात पुन्हा प्रवेश करणार का याबाबत विचारला असता ते म्हणाले की, “मी अपयशी राजकारणी आहे. मला मागे जाऊन काय करु शकतो हे पाहायचं आहे. आसाममध्ये जाऊन चहाची शेती करायची आहे,” असं मजेशीर उत्तरही त्यांनी दिली.
प्रशांत किशोर म्हणाले की, “आजचा निकाल तृणमूल काँग्रेसच्या बाजूने एकतर्फी होता. अटतटीची लढत झाली, असं प्रशांत किशोर म्हणाले. आम्हाला खूप संघर्ष करावा लागलं. निवडणूक आयोगाची भूमिका पक्षपातीपणाची होती, त्यामुळे आम्हाला प्रचारात अनेक अडचणी आल्या. तृणमूल काँग्रेस कामगिरी चांगली करेल, याची मला खात्री होती. पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेमुळे भाजप प्रत्येक निवडणूक जिंकेलच असं नाही.”
“ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला करणं हे भाजपासाठी फायदेशीर ठरलं नाही. पराभव झाल्यावर आपलं कुठे चुकलं हे कबूल करण्यासाठी आपण तेवढे नम्र असायला हवं. ममता यांची जनतेशी संपर्क साधण्याची क्षमता कमी लेखण्यात आली. ममता बॅनर्जी यांनी व्हीलचेअरवरुन केलेला प्रचार पब्लिसिटी स्टंट असल्याचा आरोप भाजपने केला. परंतु लोकांनीच स्पष्ट उत्तर दिलं,” असं प्रशांत किशोर यांनी नमूद तेलं.
“पश्चिम बंगालमध्ये भाजपला दुहेरी आकडा गाठण्यासाठी संघर्ष करावा लागेल. याचाच अर्थ भाजपला 100 पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत. जर भाजपला यापेक्षा जास्त जागा मिळाल्या तर मी निवडणूक रणनीतीकार म्हणून काम सोडेन,” असं निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी निवडणुकीपूर्वी म्हटलं होतं. त्यांनी यासंदर्भातील ट्विट पिन देखील करुन ठेवलं होतं. त्यांनी भाजपबाबत केलेल्या दाव्याकडे सगळ्यांचं लक्ष होतं, तो आज खरा ठरताना दिसत असून ते हिरो ठरले आहेत.