नवी दिल्ली: निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी गेल्या काही दिवसात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची दोनदा भेट घेतली. त्यानंतर काल काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचीही भेट घेतली. या भेटीचे वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जात असतानाच या भेटीतील मोठा तपशील बाहेर आला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आगामी राष्ट्रपती बनविण्यासाठी पीके म्हणजे प्रशांत किशोर यांची मोर्चेबांधणी सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
प्रशांत किशोर सर्व विरोधी पक्षांची मोट बांधत असल्याचं सांगितलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना राष्ट्रपती पदाचे उमेदवार करण्यासाठी पीके यांचे प्रयत्न सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलं. २०२२ मध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. त्यामुळे राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराची आतापासूनच शोधाशोध सुरू आहे.
प्रशांत किशोर यांनी मांडलेल्या राजकीय गणितानुसार विरोधी पक्ष एकत्रित आल्यास इलेक्टोरल कॉलेजमध्ये विरोधक सरकारच्या समोर मोठं आव्हान उभं करू शकतात. त्यातही बीजेडी नेते नवीन पटनायक त्यांच्यासोबत आल्यास विरोधकांच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराचा मार्ग मोकळा होणार आहे.
तामिळनाडू आणि महाराष्ट्रात विरोधी पक्षांचं सरकार आहे. त्यामुळे विरोधकांचं संख्याबळ वाढण्याची चिन्हे आहेत. केवळ ओडिशामध्येच विरोधकांना आकडा जुळवताना नाकीनऊ येताना दिसत आहेत. मात्र, शरद पवार राष्ट्रपतीपदाचे उमेदवार झाल्यास पटनायक पवारांना मदत करण्याची शक्यता आहे. पटनायक कुटुंबीयांशी पवारांचे जुने आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे पवारांसाठी पटनायक कुटुंब उभे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, पीकेंनी याबाबत पटनायक आणि स्टॅलिन यांचीही भेट घेतली आहे. मात्र, या भेटीतील तपशील काही उघड झालेला नाही.
प्रशांत किशोर यांनी मंगळवारी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेट घेतली. त्यातून विरोधक एकत्र येण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. तब्बल दोन तास त्यांनी राहुल आणि प्रियंका यांच्याशी चर्चा केली. विरोधक एकत्र आल्यास भाजपचा गेम प्लान उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे. त्याचा २०२४ च्या निवडणुकीत विरोधकांना फायदाच होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
प्रशांत किशोर यांचे ममता बॅनर्जी, जनग रेड्डी, अरविंद केजरीवाल, एमके स्टॅलिन, उद्धव ठाकरे यांच्याशी चांगले संबंध आहे. त्यामुळे या नेत्यांना एकत्रित आणण्यास पीकेंना काहीही अडचण होणार नाही. काल पीके यांनी काँग्रेसच्या नेत्यांना एक प्रेझेंटेशन दिलं. त्यात विविध राज्यातील काँग्रेसच्या स्थितीवर भाष्य करण्यात आलं आहे.