सत्ता बदलली सूरही बदलला; नेपाळचे भारतावरील प्रेम पुन्हा उफाळले !
काठमांडू : नेपाळमध्ये सध्या नेपाळी काँग्रेस सत्तेत आली आहे. शेर बहादूर देउबा यांनी १३ ऑगस्ट रोजी आपल्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळाचा एक महिना पूर्ण केला. यापूर्वी नेपाळच्या पंतप्रधानपदाची सूत्रं केपी शर्मा ओली यांच्या हाती होती. त्यांच्या कार्यकाळात भारत आणि नेपाळ या देशांच्या संबंधांमध्ये थोडा तणाव आला होता. परंतु आता नेपाळी काँग्रेसनं मात्र भारताबद्दलचं प्रेम बोलून दाखवलं आहे. चीन एक विशेष शेजारी म्हणून भारताची जागा कधीच घेऊ शकत नाही, असं नेपाळी काँग्रेसनं म्हटलं आहे.
दरम्यान, नेपाळी काँग्रेसनं लिम्पियाधुरा-कालापानी-लिपुलेख प्रकरणीही तोडगा काढण्यावर विशेष जोर दिला. सध्या पंतप्रधान देउबा यांनी आपल्या सोबत असलेल्या सहकारी पक्षासोबत मिळून कामाला सुरूवात केली आहे. नेपाळनं गेल्या वर्षी लिम्पियाधुरा-कालापानी-लिपुलेख हे भाग आपल्या नकाशामध्ये जोडून त्यावर आपला दावा केला होता. नेपाळचे माजी अर्थ राज्यमंत्री आणि नेपाळ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उदय शमशेर राणा यांनी नेपाळ ‘शेजारी प्रथम’ या सिद्धांतावर काम करत राहणार असल्याचं म्हटलं.याशिलाय अन्य देशांशीही संबंध उत्तम ठेवण्यावर भर दिला जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
नेपाळला चीनची गरज आहे आणि चीन आमचा उत्तम शेजारी राहिला आहे. परंतु भारत आमच्यासाठी विशेष आहे. चीन भारताची जागा कधीच घेऊ शकत नाही. पंतप्रधान देउबा यांना समस्यांचं योग्यरित्या समाधान काढावं लागणार आहे. कारण ते एका नाजुक युती सरकारचं नेतृत्व करत आहेत. त्यांना आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन भारत आणि चीन सोबत स्थिर संबंध प्रस्थापित करावे लागतील, असंही राणा म्हणाले.
नेपाळ भारतासाठी स्ट्रॅटेजिक महत्त्व ठेवतो असं भारताचं म्हणणं आहे. भारत आणि नपाळ दरम्यान द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यास कटिबद्ध आहोत, असं भाजपचे प्रवक्ते गोपाल कृष्ण अग्रवाल यांनी सांगितलं. काठमांडूतील भारतीय दुतावासानुसार भारत मोठ्या प्रमाणात नेपाळला विकासात मदत करत आहे. पायाभूत सुविधा, आरोग्य, जल संवर्धन, शिक्षण, ग्रामीण आणि सामुदायिक विकास यामध्ये मोठ्या प्रमाणात काम करत असल्याचंही सांगण्यात आलं.