मुंबई/अलिबाग/पुणे/अहमदनगर : आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज अहमदनगर जिल्ह्यातील सोनई येथे मुळा साखर कारखान्यात डिस्लेरीचे उद्घाटन करण्यात आलं. यावेळी आदित्य ठाकरेंनी विरोधकांना नाव न घेता चिमटे काढले आहेत. पर्यावरण मंत्री म्हणून प्रदूषण कमी करण्यावर आदित्य ठाकरेंचा सध्या भर आहे. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी भाजपलाही नाव न घेता चिमटे काढले आहेत.
राजकारणात भाजपने प्रदुषण वाढवले असा अप्रत्यक्ष टोला आदित्य ठाकरे यांनी लगवाला आहे. त्यामुळे यावरून आता राजकारण तापण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसात संजय राऊतांनी पत्रकार परिषदा घेत रान पेटवलं आहे. तर दुसरीकडून भाजप नेते किरीट सोमय्या राऊत आणि शिवसेनेवर आरोपांची बॅटिंग करत खिंड लढवत आहेत. कोविड काळात ठाकरे सरकारने मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. आज सोमय्यांनी कोर्लाई गावत दाखल होत राजकारण आणखी तापवलं आहे. भाजप नेत्यांकडूनही राऊतांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे.
आज आदित्य ठाकरेंनी याच पॉलिटिकल राड्यावरून निशाणा साधत भाजपला टार्गेट केले आहे. राजकारणातलं प्रदूषण वाढलं आहे, ते राजकारणातील हे प्रदूषण संपवणार असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला आहे. तसेच राजकारणाची पातळी घसरलीय. दररोज काहीतरी सुरू असतं, त्यामुळे ते थाबवण्याची गरज आहे. असे म्हणत त्यांनी टीका केली आहे. आज प्रदुषणमुक्त डिस्लरीचे उद्घाटन केले तसंच राजकारणातील प्रदुषण संपवणार, अशी हाक यावेळी आदित्य ठाकरेंनी दिली आहे. संजय राऊतांची पत्रकार परिषद आणि किरीट सोमय्यांना धक्काबुक्की झाल्यापासून रोज राज्यात मोठा पॉलिटिकल राडा सुरू आहे. भाजप आणि शिवसेना यावरून पुन्हा आमनेसामने आले आहेत.
सोमय्यांना जमीन प्रकरणात एवढा इंटरेस्ट का? अक्षता नाईकांचा सवाल
अन्वय नाईक यांच्या आत्महत्याप्रकरणावरून पुन्हा एकदा अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे. अर्णब गोस्वामीला अटक झाल्यानंतर हाच सर्वात पुढे होता, तोच सगळीकडे धावत होता. रश्मीताईंना माझी विनंती आहे की, तो आताही जमीनीच्या प्रकरणात एवढा इंटरेस्ट घेत आहे, त्याला एखाद्या माळ्याचे काम तरी मिळून द्या. माझ्या वडिलांनी लावलेली झाडे आहेत, ती आता सुकत आहेत. किरीट सोमय्या यांना माळ्याचे काम दिले तर ते त्या झाडांची तरी देखरेख करतील. माळ्याची नाही जमली तर कमीत कमी त्यांना वॉचमनची तरी नोकरी द्यावी असा टोला अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी सोमय्यांना लगावला आहे. तसेच सोमय्या यांनी जमीन व्यवहारावरून उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर जे आरोप केले आहेत, त्या आरोपांना देखील अक्षता नाईक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
यावेळी अक्षता नाईक म्हणाल्या की, त्याने म्हटले या जमीनीवर ठाकरे परिवाराचे १९ बंगले आहेत. १९ कशाला हा उद्या म्हणेल तिथे हजार बंगले होते. या जमीनीत हिऱ्याची खाण आहे. तो ज्या पद्धतीने या प्रकरणात इंटरेस्ट घेत आहे. त्यावरून असे वाटते की याला वॉचमनची नोकरी द्यावी, निदान तो त्या जमीनीची देखरेख तरी करेल असे अक्षता नाईक यांनी म्हटले आहे. मी किरीट सोमय्या यांनाही सांगते की, तुम्हाला जर एखादी माहिती हवी असेल तर तुम्ही माहितीच्या अधिकाराचा उपयोग करू शकता. त्यासाठी तुम्हाला शक्तीप्रदर्शन करण्याची काहीच गरज नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
फडणवीस सरकारवर देखील निशाणा
ज्याच्यावर अन्याय झाला आहे त्याच्या बाजूनने उभे राहिचे की? गुन्हेगाराला पाठिशी घालायचे असा सवाल करत अक्षता नाईक यांनी तत्कालीन फडणवीस सरकारवर देखील निशाणा साधला आहे. जेव्हा माझ्या पतीने आत्महत्या केली तेव्हा कोणाचं सरकार होतं, तेव्हा नेमकं काय झालं हे सर्वाना माहिती आहे. त्यावर अधिक काही बोलण्याची गरज नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच सोमय्या हे ज्या पद्धतीने आरोप करत आहेत, ते त्यांनी तातडीने थांबावे अन्यथा आम्ही त्यांच्यावर कारवाई करू असा इशारा देखील अक्षता नाईक यांनी दिला आहे.
संजय राऊतांना ‘मातोश्री’ डळमळीत करायची आहे का?, चंद्रकांत पाटलांचा सवाल
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांवर जोरदार हल्ला चढवला. संजय राऊत यांना मातोश्री डळमळीत करायची आहे. ते कुणाच्या इशाऱ्यावर चालतात हे सगळ्यांना माहिती आहे, अशी खोचक टीका चंद्रकांत पाटील यांनी केलीय.
संजय राऊत यांनी त्यांच्यावरील आरोपांबाबत बोलायला हवे होते. पाटकर कोण, राऊत कोण, तुमच्या मुलीची व्यावसायिक भागिदारी आहे की नाही, ज्यांना कोविड सेंटरची कामे मिळाली ते कोण, त्यात भागिदारी आहे का याबद्दल संजय राऊत यांनी बोलायला हवे होते. पण त्याऐवजी त्यांनी खूप दिवसांपूर्वी बाहेर आलेला मुख्यमंत्र्यांचा १९ बंगल्यांचा विषय पुन्हा काढून तो विषय पटलावर आणला. तसेच रश्मी उद्धव ठाकरे यांचा विषय पुढे आणला. संजय राऊत यांनी बंगल्यांचा विषय काढण्याचे काहीच कारण नव्हते. त्यांचा हेतू संशयास्पद आहे. त्यांना मातोश्री डळमळीत करायची आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.
राज्यात सध्या जे काही चाललं आहे त्याबाबत अॅक्शनला रिअॅक्शन होतच राहणार असं म्हणावं लागेल. सगळ्यांना कुणीतरी अधिकारवाणीने सांगू शकेल अशी अराजकीय व्यक्ती राहिलेली नाही. अशावेळी मुख्यमंत्र्यांची मोठी जबाबदारी असते. मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन सगळ्यांना बोलवावं, पण ते कसे बोलावणार? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केलीय. त्याचबरोबर संजय राऊत यांनी ‘मातोश्री’ डळमळीत करायची आहे का? ते कुणाच्या इशाऱ्यावर चालतात हे सगळ्यांना माहिती आहे. सगळा चिवडा झाला आहे, अशी खोचक टीकाही चंद्रकांतदादांनी केलीय.
सामनामध्ये कशी भाषा वापरली जाते ते आपण पाहतोच. रश्मी वहिनी सामनाच्या संपादक आहेत. त्यांना बदला आणि अनिल परब यांना संपादक करा, असा सल्लाही चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला दिलाय. इतकंच नाही तर महाविकास आघाडीचे जे सर्वेसर्वा आहेत ते काँग्रेस आणि शिवसेनेला कटपुतळीप्रमाणे नाचवत आहेत, असा जोरदार टोला चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लगावलाय. नारायण राणे यांनी केलेल्या खळबळजनक ट्विटबाबतही चंद्रकांत पाटलांनी मत व्यक्त केलंय. राणेंच्या ट्विटबाबत माहिती नाही. पण ते केंद्रीय मंत्री आहेत. ते माहितीच्या आधारेच बोलतात, असा दावा पाटील यांनी केलाय.
कठपुतळीच्या खेळाप्रमाणे नाचवतात
महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा हे खूप हुशार राजकारणी आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या ध्यानात येत नाही की, हे सर्वेसर्वा कठपुतळीच्या खेळाप्रमाणे आपल्याला खेळवत आहेत, असा टोला त्यांनी लगावला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बंगल्याची पाहणी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने नोटीस बजावल्याविषयी एका पत्रकाराने प्रतिक्रिया विचारली असता चंद्रकांत पाटील म्हणाले की, हे सुडाचे राजकारण चालू आहे. क्रिया प्रतिक्रिया चालू आहे. त्यांना जे करायचे ते त्यांनी करावे मग आम्हीही आम्हाला जे करायचे ते करू. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
मुख्यमंत्र्यांनी खुर्चीसाठी मिसेस रश्मी ठाकरे यांच्याशी गद्दारी केलीय का?, सोमय्या यांचा सवाल
रश्मी ठाकरे या १९ बंगले नावावर करण्यासाठी कोर्लई ग्रामपंचायतीला पत्रं देतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बंगल्यांबाबत काहीच बोलत नाहीत. सरपंच मात्र बंगलेच अस्तित्वात नसल्याचं सांगतात. मग यापैकी खरे कोण? रश्मी ठाकरे, मुख्यमंत्री की सरपंच? असा सवाल करतानाच मुख्यमंत्र्यांनी खुर्ची वाचवण्यासाठी मिसेस रश्मी ठाकरे यांच्याशी गद्दारी केली आहे का? असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. तसेच सत्य बाहेर येण्यासाठी या प्रकरणाचा तपास करण्यात यावा अशी मागणीही सोमय्या यांनी केली आहे. सोमय्या यांनी आज रेवदंडा पोलीस ठाण्यात येऊन तसा अर्जही दिला आहे. सोमय्या आधी कोर्लई गावात आले. या ठिकाणी ग्रामसेवकाला निवेदन दिल्यानंतर ते थेट रेवदंडा पोलीस ठाण्यात आले आणि पोलिसांनाही या प्रकरणाचा तपास करावा म्हणून एक अर्ज दिला आहे.
किरीट सोमय्या आज कोर्लई गावात आले होते. त्यानंतर ते रेवदंडा पोलीस ठाण्यात गेले. त्यानंतर ते मीडियाशी बोलत होते. सरपंच म्हणतात मुख्यमंत्र्यांचे बंगले अस्तित्वात नाहीत. मुख्यमंत्र्यांची पत्नी रश्मी ठाकरे म्हणतात बंगले आहेत. म्हणून पोलीस ठाण्यात आलो. याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी पोलिसांना केली. चर्चा व्यवस्थित झाली. ग्रामसेवकांशी भेट झाली, असं सोमय्या यांनी सांगितलं. कोर्लईत शिवसैनिक जमले होते. पण पुण्यासारखं मला मारलं नाही. तिथे तर लाठीकाठी आणि दगडं घेऊन आले होते, असं त्यांनी सांगितलं.
कोर्लई ग्रामपंचायतीला व्यवस्थित भेट झाली. मुख्यमंत्री खरे की मिसेस मुख्यमंत्री याची स्पष्टता ग्रामपंचायत करू शकली नाही. ग्रामपंचायत हे मुख्यमंत्र्यांचं प्रतिनिधीत्व करतात. आम्ही ग्रामसेवकाला कागदपत्रे दिली. त्यावर आजची स्थिती हे दोन दिवसात कळवतो, असं आश्वासन ग्रामसेवकाने दिलं आहे. दोन चार तासात बंगले कसे गायब झाले. सकाळी आहे, दुपारी नाही. रश्मी ठाकरेंना आम्हाला न्याय मिळवून द्यायचा आहे. बंगल्याची वास्तविकता तपासण्यासाठी मी आलो आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खुर्ची वाचवण्यासाठी मिसेस रश्मी ठाकरे यांच्याशी गद्दारी केली का याची चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली.
सोमय्यांनी कोर्लई गावातील ग्रामपंचायतीला भेट दिली. काही कागदं बघण्यासाठी मागितली होती. आम्ही माहितीच्या अधिकारात हे कागदपत्रं मिळवले होते. या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ७ जून २०१९ रोजी ठराव केला. सौ. वायकर आणि सौ. रश्मा ठाकरे यांच्या नावाने १९ बंगल्याची घरपट्टी करण्याचा हा ठराव होता. त्यांची तशी मागणी होती. त्यानंतर टॅक्स भरला गेला. असेसमेंट उताऱ्यालाही त्याची नोंद आहे. पण मधल्या काळात बंगले नाहीत असं सरपंच म्हणाले. त्यामुळे खरं खोटं करण्यासाठी आम्ही आलो आहोत. आम्ही ग्रामसेवकाला माहिती मागितली. त्यावर तुम्ही जी कागदपत्रं दिली. त्या आधारे माहिती देऊ असं ग्रामसेवक म्हणाले, अशी माहिती आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली.
भाजप आ. प्रशांत ठाकुरांसमोर शिवसैनिकांची घोषणाबाजी
भाजप नेते किरीट सोमय्या अलिबागमधील कोर्लई गावात पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने होते. मात्र कोर्लई गावात शिवसैनिकही मोठ्या प्रमणात गोळा झाले होते. कोर्लई ग्रामपंचायतीसमोर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने सामने आले. किरीट सोमय्या यांच्यासोबत भाजप आमदार प्रशांत ठाकूर हेदेखील होते. सोमय्या आणि प्रशांत ठाकूर पंचायत समितीच्या कार्यालयात सरपंचांना भेटले. त्यानंतर प्रशांत ठाकूर बाहेर आले, तेव्हा शिवसैनिकांचा एक मोठा जमाव तिथे आला. यावेळी शिवसेने जिंदाबादच्या घोषणा सुरु झाल्या.
पंचायत समितीच्या कार्यालयातून बाहेर आलेल्या भाजप आमदार प्रशांत ठाकुर यांच्यासमोर शिवसैनिकांनी घोषणाबाजी आणि दमबाजीही करायला सुरुवात केली. ठाकरे कुटुंबियांविरोधात एक शब्दही बोललात तर महागात पडेल, असा दम काही शिवसैनिकांनी भरला. आमच्या नेत्याबद्दल वेडं-वाकडं बोललात तर आम्ही गप्प बसणार नाहीत.. १९ बंगले कुठे आहेत ते तुम्ही दाखवा.. असा दम शिवसैनिकांनी भरला.