मनसुख हिरेन प्रकरणातील पोलीस अधिकारी सचिन वाझेंची नागरी सुविधा केंद्रात बदली
मुंबई : मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणात संशयास्पद भूमिका असणारे पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी विरोधकांकडून केली जात होती. अखेर यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घोषणा करत सचिन वाझे यांची क्राईम ब्रँचमधून बदली केली जाणार, अशी घोषणा केली होती. दरम्यान, सचिन वाझे यांची नागरी सुविधा केंद्रात बदली करण्यात आली आहे.
मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणात संशयास्पद भूमिका असणारे सचिन वाझे यांना तत्काळ अटक करावी अशी मागणी विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार गोपीचंद पडळकर आणि इतर सदस्यांनी विधानपरिषदेत केली यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उत्तरात घोषणा केली की, सचिन वाझे यांची क्राईम ब्रँचमधून बदली करण्यात येईल. वाझेंची दुसऱ्या विभागात बदली करण्यात येईल जेणेकरून मनसुख हिरेन प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत केली होती. त्यानुसार ही बदली करण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी गृहमंत्री अनिल देशमुख यांची चर्चा झाल्यानंतर सचिन वाझेंना क्राईम ब्रँचमधून बदली करण्याचा निर्णय झाला असल्याचे बोलले जात आहे.