अर्थ-उद्योग

पीएनबीच्या १२७ व्या वर्धापन दिनानिमित्त PNB@Ease आउटलेट सुरू

मुंबई : पंजाब नॅशनल बँकेतर्फे देशसेवेची 127 वर्षे साजरी करत असताना PNB@Ease आउटलेट हा वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प प्रायोगिक तत्वावर सुरू केला आहे. या मॉडेलअंतर्गत, प्रवासात असतानादेखील बँकिंग सुविधा प्राप्त होते. यात बँकेच्या शाखेकडून करण्यात येणारा प्रत्येक व्यवहार ग्राहकांकडूनच सुरू केला जाईल आणि अधिकृत केला जाईल. बचत खाते सुरू करण्यापासून ते विविध प्रकारची कर्जे प्राप्त करण्यापर्यंत विविध सेवांचा लाभ हा शाखेत भेट न देता किंवा बँक कर्मचाऱ्यांच्या मदती शिवाय घेता येईल. पुढे जाऊन देशातील 165 ठिकाणी बँकेतर्फे PNB@Ease आउटलेट्स सुरू करण्यात येणार आहेत.

बँक कर्मचाऱ्यांकडून साहाय्य घेण्याचा पर्याय असलेल्या PNB@Ease आउटलेट्समध्ये पाच किऑस्क्स असतील. त्यात एटीएम, नोटांचे बंडल स्वीकारणारा अॅक्सेप्टर, खाते सुरू करण्यासाठीचा किऑस्क, कार्ड जारी करणारा किऑस्क आणि इंटरनेट सक्षम किऑस्क यांचा समावेश आहे. या सुविधेअंतर्गत एकाच छताखाली सर्व बँकिंग सुविधांचा लाभ घेता येणार आहे. या व्यतिरिक्त PNB @Ease आउटलेट्स बँकेच्या वितरण क्षमतेला चालना देतील आणि ग्राहक प्राप्त करण्याचा खर्च कमी होईल.

अशा प्रकारच्या पहिल्या आउटलेटचे उद्घाटन नवी दिल्ली येथील केंद्रिय सचिवालय मेट्रो स्टेशन येथे श्री. देबाशिष पांडा, आयएएस, सचिव आणि श्री. पंकज जैन, आयएएस, अतिरिक्त सचिव, आर्थिक सेवा विभाग यांच्या हस्ते करण्यात आले.

पीएनबीच्या 127 व्या वर्धापन दिनी त्यांच्यातर्फे अनेक डिजिटल उपक्रम सुरू करण्यात आले. यात व्हिडियो केवायसीच्या माध्यमातून ऑनलाइन बचत खाते सुरू करणे, इन्स्टा प्रि-अप्रुव्ह्ड लोन, इन्स्टा डिमॅट अकाउंट आणि इंटरनेट व मोबाइल बँकिंग सेवांच्या माध्यमातून विमा सुविधा यांचा समावेश आहे.

सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत ग्राहक, कर्मचारी आणि इतर भागधारकांनी दिलेल्या निस्वार्थी सहकार्याबद्दल धन्यवाद देताना पीएनबीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सीएच. एस. एस. मल्लिकार्जुन राव म्हणाले, “पीएनबीचा १२७ वा वर्धापन दिन हा आमच्या वारशाशी अनुरूप असलेला आमच्यासाठी महत्त्वाचा दिवस आहे. महामारीने मोठे आव्हान उभे केलेले असूनही आम्ही दोन बँकांचे आमच्या बँकेत सुरळीतपणे विलिनीकरण केले. तंत्रज्ञान, लोक आणि व्यवसायाचे एकात्मिकरण विक्रमी वेळेत पूर्ण केले. त्यामुळे आम्ही प्रगतीच्या संधींचा लाभ घेऊ शकलो. ग्राहक सेवेला आम्ही सर्वाधिक प्राधान्य देतो आणि त्यांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी डिजिटलायझेशनचे काही उपक्रम आम्ही राबविले. यात PNB@Ease आउटलेट, व्हिडियो केवायसीच्या माध्यमातून ऑनलाइन बचत खाते जलद सुरू करण्याची सुविधा, ऑनलाइन इन्स्टा प्रिअप्रूव्ह्ड लोन, ऑनलाइन इन्स्टा डिमॅट खाते इत्यादी सुविधांचा समावेश आहे.”

एकत्रीकरणानंतर सर्वात मोठी सार्वजनिक बँक झाल्याबद्दल अभिनंदन करताना आणि यशाची उंच शिखरे सर करण्यासाठी शुभेच्छा देताना आर्थिक सेवा विभागाचे सचिव आयएएस देबाशीष पांडा म्हणाले, “काळाच्या पुढे राहण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याची पीएनबीची क्षमता या लाँचच्या माध्यमातून दिसून येते. तंत्रज्ञान इन-हाऊस विकसित करण्याऐवजी डिजिटल परिवर्तनासाठी बँका फिनटेक आणि स्टार्टअप्सशी सहयोग करू शकतात आणि कर्जामध्ये वृद्धी आणि देशातील आर्थिक सर्वसमावेशकतेवर भर देऊ शकतात.”

आर्थिक सेवा विभागाचे अतिरिक्त सचिव आयएएस पंकज जैन यांनी बँकेच्या डिजिटल पुढाकाराबद्दल प्रशंसा केली आणि तंत्रज्ञानातील अपग्रेडेशन आणि ग्राहक सेवा या संदर्भात सातत्याने प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button