नवी दिल्ली : सार्वजनिक जीवनात येण्यापूर्वी ३० ते ३५ वर्षे सामाजिक कार्यकर्ता म्हणून व्यतीत केले आहेत. या कालावधीत जीवनाचा मोठा अनुभव घेतला आहे. सामान्य माणसाच्या अडचणी, आकांक्षा आव्हाने आणि क्षमता जवळून आकलन केले आहे. अथक मेहनत आणि कठोर परिश्रमानेच जनतेचा विश्वास जिंकला आहे. कोणत्याही शाही घराण्यातून येत नसल्यामुळे पीआर एजन्सीमुळे ही कामगिरी साध्य झालेली नाही, असे रोखठोक प्रतिपादन पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी केले आहे. एका नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान पंतप्रधान मोदी बोलत होते.
आमच्या कार्यकाळात राबवण्यात आलेली धोरणे, घेतलेले निर्णय सामान्य जनतेच्या समस्या कमी करणारे ठरले. म्हणूनच जनता आम्हाल त्यांच्यातील एक असेच समजते. पंतप्रधानपदी असलेली व्यक्तीला आपल्या अडचणींची जाणीव आहे, ही बाब जनतेला माहिती आहे, असेही पंतप्रधान मोदींनी नमूद केले. पीआर एजन्सीचा वापर करून प्रतिमा संवर्धन करण्याविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, पंतप्रधानपदी असलेली व्यक्ती जनतेला आपल्याच घरातील एक सदस्य वाटते. जनतेला असलेला विश्वास कोणत्याही PR एजन्सीमुळे आलेला नाही. तर, तो अथक प्रयत्नांनी संपादन केला आहे. त्यासाठी खूप घाम गाळला आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
देशवासीयांसाठी शौचालये उभारून एका प्रकारे सेवा करण्याचे कोणाच्याही मनात आले नाही. ते आम्ही करून दाखवले. आम्ही घेतलेल्या निर्णयांमुळे सामान्य जनतेला वाटते की, पंतप्रधान असलेली व्यक्ती आपल्यासारखाच विचार करतो, आपल्या समस्या जाणतो आणि म्हणूनच आपोआप ते घरातील माणूस असल्यासारखे समजतात. जिथे जातो, तिथे भरपूर प्रेम जनतेचे मिळते. जे काही आहे, ते सर्व जनतेचे आणि जनतेसाठीच आहे. स्वतःसाठी काहीच करणार आहे. सर्व जीवन देशाच्या आणि देशवासीयांसाठी समर्पित आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. दरम्यान, गेली सात वर्षे आम्ही सत्तेत आहोत. जनतेचा आमच्याबद्दल असलेला विश्वास आणखी मजबूत होत आहे. तसेच गेल्या सात वर्षातील कामगिरी हीदेखील जनतेच्या विश्वासामुळेच साध्य होऊ शकली, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.