फोकस

पंतप्रधान मोदींच्या सुरक्षारक्षकाचे मुंबईत पाकिट मारले ! 

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुरक्षा अत्यंत हुशार आणि आश्वासक एसपीजी कमांडों करत असतात. पण, पंतप्रधान मोदींचे रक्षण करणाऱ्या याच एसपीजी कमांडोचे पाकीट मुंबईच्या लोकलमधून मारण्यात आले होते. विलेपार्ले ते महालक्ष्मी या लोकलने, एसपीजी कमांडो सुभाष चंद्रा प्रवास करत असताना त्यांच्या पर्सच्या खिशातील पाकीट मारले. याबाबत त्यांनी अंधेरी पोलिसात तक्रार केली. अंधेरी पोलिसांनी पाकीटमार टोळीचा पर्दाफाश केला असून दोन जणांना अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

पंतप्रधान मोदींच्या सुरक्षा कमांडोचे पाकीट मारल्याने पोलिसांनीही यंत्रणा कामाला लावली. आपल्या खबऱ्यांकडून माहिती घेत, काही दिवसांतच मुंबईच्या गर्दीतून लोकल चोराचा थांगपत्ता शोधला. अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी या प्रकरणाची संपूर्ण माहिती दिली. सुभाष चंद्रा हे ७ नोव्हेंबर रोजी विलेपार्ले ते महालक्ष्मी असा प्रवास करत होते. त्यावेळी, चोरट्याने त्यांचे पाकिट चोरले होते. याप्रकरणी, पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर, पोलिसांनी त्यांच्या पाकिटातील वस्तूंची माहिती घेत तपास केला. त्यामध्ये, सुभाष चंद्रा यांच्या डेबिट आणि क्रेडीट कार्डमधून १९ हजार रुपयांचे व्यवहार झाल्याचे उघड झाले.

सुभाष चंद्रा यांच्या बँक खात्यातून वायफायद्वारे हे ट्रान्झॅक्शन करण्यात आले होते. त्यामुळे, पोलिसांनी सायबर क्राईमच्या मदतीने आरोपी हैदर शमशुद्दीन यास अटक केली. मीरा रोड येथे तो राहत असून आयसीआयसीआय बँकेचे स्वाईप मशिन, पेटीम कार्डही त्याकडून जप्त करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button