
नवी दिल्ली : देशातील कोरोना स्थिती बिकट असून आता शहरांनंतर ग्रामीण भागांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे दिसत आहे. काही राज्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या कमी होत असली तरी मृतांचे प्रमाण मात्र अजूनही गंभीर आहे. सध्याच्या कोरोना स्थितीवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सध्या कोरोना लस, ऑक्सिजन, औषधे जशी गायब आहेत तसे देशाचे पंतप्रधानही गायब झाले आहेत. आता फक्त ते सेंट्रल विस्टा, औषधांवरील जीएसटी आणि फोटोसेशन या कामातच अडकून आहेत.
राहुल गांधी यांनी ट्वीट करून पंतप्रधान मोदींवर टीका केली. ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, कोरोना लस, ऑक्सिजन आणि औषधांसोबतच पंतप्रधान मोदीही गायब झाले आहेत. उरले आहे ते फक्त सेंट्रल विस्टा, औषधांवर लागणारे जीएसटी आणि इकडे तिकडे सर्वत्र दिसणारे पंतप्रधानांचे फोटो.
वैक्सीन, ऑक्सीजन और दवाओं के साथ PM भी ग़ायब हैं।
बचे हैं तो बस सेंट्रल विस्टा, दवाओं पर GST और यहाँ-वहाँ PM के फ़ोटो।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 13, 2021
गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राहुल गांधी यांनी वारंवार टीका केली आहे. पाच राज्यांच्या निवडणुकांच्या काळामध्ये सभांमध्ये होणारी प्रचंड गर्दी यावरून त्यांनी पंतप्रधानांना लक्ष्य केले होते. कालच काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनीही लसीकरणाच्या उत्सवावरून पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली होती. तर बुधवारी काँग्रेसच्या नेत्यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र पाठवून सेंट्रल विस्टा प्रकल्प थांबवण्याची मागणी केली आहे.
सध्या दिल्लीत नवीन संसद आणि पंतप्रधान निवास कार्यालयाचे बांधकाम सुरू आहे. सध्याच्या बिकट काळात या गोष्टींवर होणारा खर्च थांबवून तो कोरोनासाठी खर्च करण्याची गरज असल्याचे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. इतर प्रकल्प थांबवून सध्या कोरोना लसीकरण आणि ऑक्सिजन यावर लक्ष देण्याची गरज आहे, असे राहुल गांधींचे म्हणणे आहे.