पंतप्रधान नरेंद्र मोदी भर सभेत भाजप कार्यकर्त्याच्या पाया पडले
नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी प्रचारसभेसाठी पश्चिम बंगालमध्ये आले होते. यावेळी एक भाजप कार्यकर्ता व्यासपीठावर आला आणि त्याने पंतप्रधान मोदींना साष्टांग दंडवत घातलं. हे बघून पंतप्रधान मोदींनी त्याला धरून उभं केलं. त्यानंतर असं करू नये, असं सांगत पंतप्रधान मोदी स्वतः त्या भाजप कार्यकर्त्याच्या पाया पडले.
यावेळी मोदी यांनी पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जींच्या अहंकाराचा मुद्दा उपस्थित केला. ममता दीदी कुणाचंही ऐकून घेत नाही, ऐकायचंही नसत, पण त्यांनी बघावं तरी, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. आपल्या भाषणाला सुरवात करण्यातपूर्वी भर सभेत व्यासपीठावर पंतप्रधान मोदी हे एका भाजप कार्यकर्त्याचे पाया पडले.
अम्फान वादळाचा फटका बसलेले नागरिक अजूनही तुटलेल्या छताखाली राहत आहेत. अम्फानची मदत कुणी लुटली? असा प्रश्न आता ते विचारत आहेत. गरज असलेत तेव्हा दीदी गायब असतात. निवडणूक आली की घरोघरी सरकार. हाच दीदीचा खेला (खेळ ) आहे. पश्चिम बंगाल आणि इथल्या मुलांनाही आता दीदीचा खेला समजला आहे. यामुळे दोन मे रोजी लागणारा निकाल दीदीच्या जाण्याचा दरवाजा दाखवेल. कारण तृणमूलच्या पापाचा घडा भरला आहे, अशी टीका मोदींनी केली.
ममता दीदी नंदीग्रामच्या जनतेला बदनाम करत आहेत. त्यांच्यावर खोटे आरोप करत आहेत. नंदीग्रामची स्वाभिमानी जनता तुम्हाला धडा शिकवेल. तृणमूल काँग्रेसला फक्त हिंसा, अत्याचार आणि अंधःकार हवा आहे. दीदीच्या तृणमूलने भ्रष्टाचार दिला. आमचे सरकार शोनार बांगला देईल, अशी ग्वाही मोदींनी दिली.
ममता बॅनर्जींच्या हट्टामुळे पश्चिम बंगालमधील शेतकरी पीएम किसान सन्मान निधीपासून वंचित राहिले. पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता आल्यास सर्व शेतकऱ्यांना गेल्या ३ वर्षांची पीएम किसान सन्मान निधीची थकीत रक्कम एकाच वेळी देण्याचं आश्वासन दिलं. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यासाठी २७ मार्चला मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये ३० मतदारसंघांसाठी मतदान होईल.
भारताच्या स्वातंत्र्यात मेदिनीपूर आघाडीवर होते. देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाले आहेत. देश आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. स्वातंत्र्यासाठी दिलेल्या योगदान भावी पिढीपर्यंत पोहोचवणं हे भाजप सरकारचं प्राधान्य असेल. आज २५ वर्षांपर्यंतचे जे तरुण आहेत आणि पहिल्यांदाच मतदान करत आहेत, त्यांच्यासाठी ही वेळ अतिशय महत्त्वाची आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. ‘शोनार बांगला शंखनात होताना सर्वांना दिसतोय. बंगालच्या कानाकोपऱ्यातून हा ध्वनी येत आहे. प्रत्येक जण हेच बोलत आहे. दो मोई आछे, दीदी जाछे| ऑशोल पोरिवर्तन आछे|’, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.