अहमदाबाद: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसलेल्या गुजरातची पाहणी केली. या पाहणीनंतर त्यांनी गुजरातला १ हजार कोटीचं पॅकेज जाहीर केलं आहे. तसेच वादळामध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाखांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
तौक्ते वादळामुळे गुजरात आणि दीव दमणचं मोठं नुकसान झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज या भागाची हवाई पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणीही होते. यावेळी त्यांनी राज्याला एक हजार कोटी रुपयांचे पॅकेज देण्यात येत असल्याचं जाहीर केलं. तसेच वादळातील बळींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख आणि जखमींना ५० हजाराची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. त्याशिवाय केंद्र सरकार गुजरातमध्ये इंटर मिनिस्ट्रियल ग्रुप पाठवेल. हा ग्रुप राज्यातील नुकसानीची पाहणी करून केंद्राला त्याची माहिती देईल, असं मोदींनी सांगितलं.
गुजरात आणि दीवची हवाई पाहणी केल्यानंतर मोदींनी अहमदाबादमध्ये अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी वादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. याप्रसंगी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह उपमुख्यमंत्री नितीन पटेल आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचनाही केल्या.
वादळामुळे १३ जणांचा मृत्यू
तौक्ते चक्रीवादळ सोमवारी रात्री साडे दहा वाजता सौराष्ट्रला धडकले. त्यानंतर किनारपट्टी भागात जमीन धसण्याचे प्रकार सुरू झाले. सुमारे अडीच ते तीन तास जमीन खचण्याचे प्रकार सुरू होते. वादळामुळे सौराष्ट्रातील 21 जिल्ह्यातील 84 तालुक्यात प्रचंड पाऊस झाला. आता पाऊस थांबला असला तरी या वादळी पावसामुळे गुजरातमध्ये आतापर्यंत १३ लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच जागोजागी मोठ मोठे वृक्ष उन्मळून पडले आहेत. विजेचे खांब, सोलर पॅनलही उन्मळून पडले आहेत. अनेक ठिकाणी तर मोबाईल टॉवरही पडले आहेत. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. गावांमध्ये पावसाचे पाणी भरल्याने अनेक गावांचा संपर्कही तुटला आहे. जाफराबादमध्ये तर पूरस्थिती निर्माण झाली आहे.
२४०० गावातील वीजपुरवठा खंडित
वादळामुळे गुजरातमध्ये ४० हजार वृक्ष उन्मळून पडले आहेत. १६,५०० कच्ची घरेही पडली आहेत. २४०० हून अधिक गावांमध्ये अजूनही वीज नाही. अनेक ठिकाणी विजेचे खांब तुटले आहेत. १२२ कोविड हॉस्पिटलमध्ये वीज नसल्याने अंधार पसरला आहे. वादळामुळे राज्यात लसीकरण थांबवण्यात आले आहे. येत्या २० मे पासून लसीकरणाचा कार्यक्रम पुन्हा सुरू करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
इतर राज्यांनाही मदत करणार
चक्रीवादळाचा फटका बसलेल्या सर्व राज्यांना केंद्राकडून लवकरच मदत करण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. वादळामुळे झालेल्या नुकसानीची माहिती राज्यांनी केंद्राला द्यावी. त्यानुसार राज्यांना मदत केली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. या पाहणीनंतर मोदींनी ट्विटही केलं आहे. चक्रीवादळामुळे गुजरात आणि दीवचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे या भागांची पाहणी केली. चक्रीवादळाचा फटका बसलेल्या सर्व राज्यांसोबत केंद्र सरकार काम करत आहे, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.