Top Newsराजकारण

मुंबईतील वाढीव प्रभागांचा आराखडा निवडणूक आयोगाला सादर

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीचे वेध सर्वच राजकीय पक्षांना लागले आहेत. सर्वत्र निवडणूक तयारीला सुरुवात झाली आहे. मुंबई महापालिकेनेही निवडणूक प्रक्रियेची पूर्व तयारी केली आहे. पालिकेने, वाढीव प्रभागांसह २३६ प्रभागांचा आराखडा राज्य निवडणूक आयोगाला सादर केला आहे. यामध्ये, मतदान केंद्र, बुथ, कर्मचारी संख्या, मतदार यादी, सीमांकन आदींची माहिती अंतर्भूत आहे.

मात्र जर त्यामध्ये काही बदल असतील तर ते निवडणूक आयोगाकडून पालिकेला कळविण्यात येणार आहेत. त्याप्रमाणे पुढे सुधारणा करण्यात येणार आहे. यासंदर्भातील माहिती पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीचा आराखडा निवडणूक आयोगाला सादर झाल्याने आता पालिका निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर केल्या जाऊ शकतात.

मुंबई महापालिकेची मुदत ८ मार्चपर्यंत आहे. तत्पूर्वी निवडणूक तयारी पूर्ण होणे अपेक्षित आहे. मुंबईत आगामी निवडणुकीसाठी ९ प्रभाग वाढवले आहेत. म्हणजेच ९ नगरसेवकांची वाढ होणार आहे. मुंबई शहर व उपनगरे येथे विविध राजकीय पक्षाचे २२७ नगरसेवक आहेत. त्यामध्ये आता राज्य सरकारच्या मंजुरीने ९ नगरसेवकांची वाढ होणार आहे. त्यामुळे मुंबईतील नगरसेवकांची संख्या २३६ होणार आहे. तसेच, पालिकेत ५ नामनिर्देशित नगरसेवक आहेत.

वास्तविक, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ९ प्रभाग वाढविण्याबाबत मंजुरी घेतली आहे. २३६ प्रभागांचा आराखडा निवडणूक आयोगाला सादर केला आहे. आता त्यावर निवडणूक आयोग हरकती व सूचना मागवणार आहे. हरकती सूचना प्राप्त झाल्यानंतर त्यात काही बदल असेल तर निवडणूक आयोग पुन्हा सुधारित आराखडा तयार करण्यासाठी मुंबई महापालिका सूचना करणार आहे. सुधारित आराखडा महिनाभरात पुन्हा निवडणूक आयोगाला सादर केला जाईल, असेही सुरेश काकाणी यांनी सांगितले. पालिकेची मुदत संपण्यापूर्व पालिका प्रशासन वेगाने काम करत आहे, वाढीव प्रभागांसह सर्व बाबींचा आराखडा निवडणूक आयोगाला सादर केल्याचे काकाणी यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button