नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव निवडणुकीआधी भाजपसाठी सर्वात मोठे आव्हान बनले आहे. अखिलेश यादव हे सतत सत्ताधारी भाजपावर निशाणा साधत आहेत. समाजवादी पक्षाच्या नेत्यांचे फोन टॅप केले जात आहेत आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ स्वतः दररोज संध्याकाळी त्यांचे रेकॉर्डिंग ऐकतात, असा आरोप अखिलेश यादव यांनी केला आहे.
आयकर विभागाने समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय सचिव राजीव राय आणि अखिलेश यादव यांचे स्वीय सचिव जैनेंद्र यादव यांच्यासह जवळच्या नेत्यांच्या घरांवर छापे टाकले. यानंतर अखिलेश यादव यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आणि त्यांना निरुपयोगी मुख्यमंत्री म्हणून संबोधले. अखिलेश म्हणाले की, समाजवादी पक्षाच्या नेत्यांच्या ठिकाणांवर टाकलेले छापे, हे भाजपचा निवडणुकीत पराभव होणार असल्याचे लक्षण आहे. दरम्यान, राजीव राय हे अखिलेश यादव यांचे निकटवर्तीय असून २०१२ मध्ये राज्यात समाजवादी पक्षाचे सरकार आणण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. तसेच, राजीव राय यांच्या कर्नाटकमध्ये शिक्षणसंस्था आहेत.
काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका कार्यक्रमात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले. यावेळी नरेंद्र मोदी यांनी ‘यूपी + योगी’ म्हणजेच जनतेसाठी ‘उपयोगी’ असा उल्लेख केला. यावरून योगी आदित्यनाथ यांचे नाव न घेता अखिलेश यादव यांनी ‘निरुपयोगी’ असल्याचे म्हणत निशाणा साधला. अखिलेश यादव म्हणाले, मुख्यमंत्री निरुपयोगी आहेत. त्यांना कॉम्प्युटर आणि स्मार्टफोन कसा चालवायचा हेही कळत नाही. त्यांना कोणी कॉम्प्युटर दाखवला तर घाबरतात.
दरम्यान, अखिलेश यादव यांनी काल सुद्धा आयकर विभागाच्या कारवाईचा विरोध केला होता. भाजपने सरकारी यंत्रणांचा गैरवापर सुरू केला आहे. या यंत्रणांनाच भाजपने जणू निवडणुकीत उतरवले आहे. आयकर विभागाने (आयटी) छापे घातले. आता अजून ईडी, सीबीआय यांचे छापे पडणेही बाकी आहे, अशी उपरोधिक टीका अखिलेश यादव यांनी केली.