फोन टॅपिंग हा देशाच्या स्वातंत्र्याला धोका, पंतप्रधान, गृहमंत्र्यांनी खुलासा करावा : संजय राऊत
नवी दिल्ली: परदेशी कंपन्या आणि अॅपकडून काही पत्रकार आणि राजकारण्यांचे फोन टॅप झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. फोन टॅपिंग हा देशाच्या स्वातंत्र्याला धोका असून पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी स्वत: त्यावर खुलासा केला पाहिजे, असं संजय राऊत यांनी सांगितलं. तसेच या मुद्द्यावर संसदेत आवाज उठवणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
देशातील राजकारणी, पत्रकार आणि संपादक अशा १५०० हून अधिक लोकांचे फोन टॅप झाल्याची बाब उघड झाली आहे. विशेष म्हणजे परदेशी कंपन्या आणि अॅपने हे फोन टॅप केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यावर संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. फोन टॅपिंग झाल्याची काही नावं समोर आली आहेत. अजून बरीचशी नावं समोर यायची आहे. यावेळी पत्रकारांचे सर्वाधिक फोन टॅप झाले. संपादकांचेही फोन टॅप झाले. हे गंभीर आहे. गेल्या काही वर्षापासून पत्रकार, राजकारणी या देशात भीतीच्या सावटाखाली वावरत आहेत. आपल्यावर पाळत ठेवली जाते, आपले फोन टॅप केले जातात. ही सगळ्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. त्यावर पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्र्यांनी समोर येऊन खुलासा करणं गरजेचं आहे. काही परदेशी कंपन्या, परदेशी अॅप अशाप्रकारे या देशाच्या प्रमुख लोकांचे फोन ऐकत असतील तर या देशातील स्वातंत्र्याला सर्वात मोठा धोका आहे, असं राऊत म्हणाले.
या देशाचं शासन आणि प्रशासन कमजोर आणि दुबळं असल्याचं हे लक्षण आहे. कोणीही ऐरागैरा येतो आणि आमचे फोन टॅप करतो. आमच्याकडे सायबर क्राईम संदर्भात कठोर नियम नाही, कायदे नाहीत. सरकारला ज्या पद्धतीने समोर येऊन या सर्व गोष्टींचा मुकाबला करायला हवा. ते दिसत नाही. त्यामुळे देशात सर्वच क्षेत्रात भीतीचं वातावरण आहे, अशी टीका त्यांनी केली. याबाबत काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी माझं बोलणं झालं आहे. आम्ही हा प्रश्न संसदेत लावून धरणार आहोत, अशी माहितीही त्यांनी दिली.
महाराष्ट्रात सरकार बनत असताना त्याआधी फोन टॅप करण्यात आले होते. फोन टॅप करणारे आमचेच म्हणजे महाराष्ट्रातील होते. त्याची चौकशी सुरू आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी हे प्रकरण विधानसभेत मांडलं. त्यावर चौकशी लावली. महाराष्ट्रातील वरिष्ठ अधिकारी या फोन टॅपिंगमध्ये होते, त्याची चौकशी सुरू आहे, असं सांगतानाच उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे फोन टॅप कोणी करत असेल तर आश्चर्य वाटणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.