मुंबईतील कोविड रुग्णांची संख्या नियंत्रणात आल्यास चित्रीकरणासाठी परवानगी : उद्धव ठाकरे
मुंबई : राज्यात कोविडची दुसरी लाट आल्यानंतर राज्यातील सर्व प्रकारच्या चित्रीकरणाला बंदी करण्यात आली होती. मात्र आता कोविड रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याने राज्यात अनलॉक प्रक्रियेला सुरुवात झालीय. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चित्रपट निर्मात्यांना काहीसं दिलासं देणारं वक्तव्य केलंय. निर्मात्यांनी राज्य शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. चित्रीकरणासाठी सावधानता आणि खबरदारी पाळायची आहे. तसेच ‘ब्रेक दि चेन’मधील नव्या वर्गवारीप्रमाणे नियमांचे पालन करा. येत्या काळात मुंबईतील कोविड बधितांची संख्या नियंत्रणात आली, तर मुंबईत चित्रीकरणासाठी परवानगी देऊ, असं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चित्रपट आणि टीव्ही मालिका निर्मात्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे आज संवाद साधला. या चर्चेमध्ये मुख्यमंत्र्यांनी शासन घेत असलेल्या निर्णयांच्या अनुषंगाने सहकार्य करावे, असे आवाहन केले. तसेच या संवादात निर्मात्यांनी आपल्या विविध सूचना मांडून एकजुटीने शासन घेईल त्या निर्णयांना पाठिंबा असेल, असे आश्वासन दिले आहे.
राज्यात गेल्या वर्षी कोविड विषाणूचा संसर्ग वाढल्याने गेल्या वर्षी प्रथम लॉकडाऊन करण्यात आला. या वर्षी एप्रिलमध्ये पुन्हा कोविड संसर्ग वाढू लागल्याने लॉकडाऊन करण्यात आला. लॉकडाऊनमुळे सगळेच बंद होते आणि मग चित्रीकरणाचे नॉकडाऊन होते. मात्र आता आपल्याला हळूहळू अनलॉक करत असताना लॉकडाऊन नको आणि नॉकडाऊन नको, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले
ज्या शहरांमध्ये, गावांमध्ये, जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटीचा रेट हा ५ ते १० टक्क्यांमध्ये आहे तिथे हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेडवर उपचार घेणारे रुग्ण ४० टक्क्यांहून अधिक आहे. ते सर्वजण लेव्हल तीनमध्ये येतात. अशा जिल्ह्यांमध्ये मालिका, सिनेमाची चित्रीकरणे केली जाऊ शकतात. परंतु त्यासाठी काटेकोर नियमांचे पालन सक्तीचे आहे. चित्रीकरण आखून दिलेल्या नियमांमध्ये करणे आवश्यक आहे. चित्रीकरणाशी संबंधित असलेले कलाकार, तंत्रज्ञ, इतर कर्मचाऱ्यांना ‘बायोबबल’ वातावरणातच राहणे बंधनकारक आहे. तसेच अधिकाधिक कलाकारांचे लसीकरण करण्यावर भर देण्यात यावा, असंही ठाकरे यावेळी म्हणाले.
या बैठकीत टास्क फोर्स प्रमुख डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, के.माधवन, मेघराज राजेभोसले, आदेश बांदेकर, प्रशांत दामले, भरत जाधव, सुबोध भावे, डॉ. अमोल कोल्हे, सिद्धार्थ रॉय कपूर, जे.डी.मजेठिया, अमित बहेल, झी समूहाचे पुनीत गोयंका, दीपक राजाध्यक्ष, अजय भाळवणकर, सतीश राजवाडे, निलेश पोतदार, संग्राम शिर्के, विजय केंकरे, शरद पोंक्षे, प्रसाद कांबळी, अनिकेत जोशी, अशोक दुबे, नितीन वैद्य, अशोक पंडित, आदी सहभागी झाले होते.