मोहाली : भारतीय संघाची दोन सामन्यांची कसोटी मालिका ४ मार्चपासून सुरू होणार आहे. रोहित शर्मा पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून मैदानात उतरणार आहे. त्यात महत्त्वाची बाब म्हणजे विराट कोहलीचा हा १००वा कसोटी सामना असणार आहे. पंजाबच्या धर्मशालामध्ये झालेल्या दोन टी-२० सामन्यात प्रेक्षक मोठ्या संख्येने हजर होते. बंगळुरूत होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठीही प्रेक्षकांच्या हजेरीला परवानगी देण्यात आली आहे. पण विराटचा १०० वा कसोटी सामना प्रेक्षकांविना खेळवला जाणार होता. त्यामुळे चाहत्यांना मात्र यात बीसीसीआयचं गलिच्छ राजकारण असून हे राजकारण थांबवा असा संताप सोशल मीडियावरून व्यक्त करण्यात आला. त्यानंतर आता या सामन्यात स्टेडियमच्या ५० टक्के क्षमतेइतक्या प्रेक्षकांना प्रवेश मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे.
कोरोनाच्या नियमांमुळे या सामन्यासाठी प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली नव्हती. पण इतर सामन्यांसाठी प्रेक्षकांना परवानगी असताना हाच सामना अशा प्रकारचा खेळवण्यामागे बीसीसीआयचं गलिच्छ राजकारण जबाबदार असल्याचं मत अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर मांडल्याचं दिसलं. त्यानंतर आता या सामन्यात स्टेडियमच्या ५० टक्के क्षमतेइतक्या प्रेक्षकांना प्रवेश मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आता स्टेडियममध्ये विराटच्या नावाचा जल्लोष होणार हे नक्की झालं आहे.
कसोटी सामन्यासाठी जे लोक स्टेडियममध्ये ऑन ड्युटी असतील, त्यांना वगळता इतर कोणालाही स्टेडियमच्या आवारात प्रवेश दिला जाणार नाही, असं पंजाब क्रिकेट बोर्डाने सांगितलं होतं. बीसीसीआयने ठरवून दिलेल्या कोविडच्या नियमांनुसारच हा निर्णय घेण्यात आला आहे. मोहाली आणि आसपासच्या भागात कोविडच्या काही केसेस आढळल्या आहेत. त्यामुळे सावधगिरी बाळगत हा निर्णय घेण्यात आला आहे, असंही स्पष्ट करण्यात आलं होतं. तसेच, विराटसाठी हा मोठा सामना असल्याने संपूर्ण स्टेडियममध्ये विराटचे मोठे बॅनर्स लावून सजावट केली जाईल, असं सांगण्यात आलं होतं. पण चाहत्यांनी या प्रकरणात बीसीसीआय राजकारण करत असल्याचा आरोप सोशल मीडियावर केला. त्यानंतर अखेर आता पहिल्या कसोटी सामन्यात प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे.