मुंबई : शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर आज पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. किरीट सोमय्या यांनी मुंबईत पुर्नवसनाच्या नावाखाली ३०० ते ४०० कोटींची वसुली केली असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री आणि आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रार करणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणात पडू नये. बेगाने शादी में नाचू नये. लोक सोमय्यांची धिंड तर काढतीलच, पण तुमचेही कपडे फाटतील, असा सल्ला राऊत यांनी दिला आहे. सोमय्यांची एकूण २११ प्रकरणे माझ्याकडे आली आहेत. त्यांनी एकूण सात साडेसात हजार कोटींचा हा घोटाळा केला आहे. त्यांनी खुशाल माझ्याविरोधात कोर्टात जावं, असं आव्हानच राऊत यांनी दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर धमक्या देऊन सोमय्या यांनी पैसे उकळले आहेत. ही प्रकरणे मी काढत आहे. ‘उखडना है तो उखाडलो’, असा इशाराही त्यांनी दिला.
संजय राऊत यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना हा सल्ला दिला आहे. मागील दोन दिवसांपासून राऊत यांनी भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी म्हटले की, मुंबई आयआयटी जवळील पेरूबाग येथील पुर्नवसन प्रकल्पात किरीट सोमय्या यांनी ४३३ बोगस लोकांना प्रकल्पात घुसवले. ही सर्व बोगस लाभार्थी किरीट सोमय्या यांची एजंट होती. प्रत्येकाकडून किमान २५ लाख रुपये सोमय्या यांनी घेतले असल्याचा आरोप राऊत यांनी केला. या पुर्नवसन प्रकल्पात बोगस लाभार्थ्यांना स्थानिक रहिवासी दाखवण्यासाठी बनावट आधारकार्ड आणि इतर कागदपत्रांचा आधार घेण्यात आला असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. या पुर्नवसन प्रकल्पाच्या घोटाळ्यातील कागदपत्रे घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागालाही या प्रकरणाची कागदपत्रे देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सोमय्या यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर वसुली केली असल्याचे राऊत यांनी सांगितले. फडणवीस यांना या गैरप्रकाराबाबत काही माहिती असण्याची शक्यता कमी असल्याचे राऊत यांनी सांगितले.
महाआयटी घोटाळ्यातील आरोपी फरारी
भाजपच्या सत्ताकाळात झालेल्या महाआयटीच्या २५ हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोपी अमोल काळे हा देशाबाहेर पळून गेला असल्याची माहिती असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले.