Top Newsराजकारण

काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नये.: भुजबळ

नाशिकः शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेना भवनासमोर पत्रकार परिषद घेऊन एकच राळ उडवून दिलीय. त्यानंतर राज्यातील मुंबईसह इतर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय हवा गरम झालीय. संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेला किरीट सोमय्या, नारायण राणे, चंद्रकात पाटलांसह इतर नेत्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. आता या राजकीय आखाड्यात मंत्री छगन भुजबळ उतरले आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांना पोलिसांनी नोटीस बजावल्याची माहिती त्यांनी दिलीय. शिवाय सध्या सरकारी यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. या सदर्भात सर्वपक्षीय खासदारांनी पंतप्रधान, राष्ट्रपती यांची भेट घेतली पाहिजे, अशी मागणी केलीय. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसनेही आता या वादात उडी घेतल्याने राजकीय आरोप-प्रत्यालारोपाला पुन्हा रंग चढणार आहे.

मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, विरोधी पक्षाचे सरकार ज्या – ज्या राज्यात आहे, तिथे – तिथे जणू धरून मारतात अशी स्थिती आहे. त्यामुळे तिथल्या- तिथल्या मुख्यमंत्र्यांनी दिल्लीला जाऊन भेट घेतली पाहिजे. सध्या जे राजकारण सुरू आहे, ते कोणाला अभिप्रेत नाही. सरकार पाडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे कळते. मात्र, सरकारी पक्षाच्या लोकांवर कारवाई करून ईडी आणि इतर चौकशी लावतात ते योग्य नाही. सरकारी यंत्रणांनी कोणत्याही दबावाखाली येऊन काम करू नये. भाजपमधील नेत्यांवर कारवाई का होत नाही, असा सवालही त्यांनी केलाय.

मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नये. आरोप झाले, तर प्रत्यारोप होणार. यंत्रणा काम करतील. तुम्हाला मध्ये जायचे, प्रसिद्धीसाठी काही काम करायचे याची गरज नाही. सरकार पडण्याचे काम कोणी करू नये. प्रत्येकाने संयमाने भाषा वापरावी. राग आणि ताप वाढला की, अनावर होतो आणि यातून अशी भाषा पुढे येते. मी या सर्व त्रासातून गेलो आहे. आधी लोकांना खरे वाटले. मात्र , न्यायालयाने केस डिस्चार्ज केली आहे. आमची लढाई आज ही सुरू आहे.

भुजबळ म्हणाले की, काही लोकांना त्रास दिला जातोय. प्रधानमंत्री आणि गृहमंत्री यांचा काय संबंध आहे, माहिती नाही. आम्ही कोणाला तक्रार केली नाही. मात्र, पोलिसांची नोटीस प्राप्त झालीय. कोविड काळात गर्दी जमवू नये, नियमांचा भंग झाला म्हणून नोटीस बजावली आहे. किरीट सोमय्या या सारख्या मोठ्या नेत्यांची काळजी पोलीस आणि सरकारला आहे. त्यामुळे त्यांनी पुन्हा असे करू नये म्हणून ही नोटीस बजावल्याचे उत्तरही त्यांनी दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button