Top Newsराजकारणशिक्षण

डिसले गुरुजींचा स्कॉलरशिपसाठी परदेशात जाण्याचा मार्ग मोकळा; वर्ष गायकवाड यांचे निर्देश

मुंबई/सोलापूर : ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते रणजितसिंह डिसले यांच्या परदेशात स्कॉलरशिपसाठी जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकरणी राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, माझं सीईओंशी बोलणं झालं आहे, त्यांना स्कॉलरशिपसाठी आवश्यक परवानगी दिली जावी, त्यांना परदेशात पाठवायचं आहे, असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या.

वर्षा गायकवाड म्हणाल्या की, डिसले सरांसदर्भात मी स्वामींशी बोलले आहे. त्यांना रीतसर परवानगी दिली जाईल. डिसले यांनी प्रोसीजर प्रमाणं अर्ज दिला नव्हता. आता त्यांना प्रक्रियेप्रमाणं कार्यवाही करत परदेशी जाण्याची परवानगी दिली जाणार आहे. डिसले यांना परवानगी देण्यासंदर्भात मी निर्देश दिले आहेत. तसेच डिसलेंवर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी केली जाईल असंही वर्षा गायकवाड म्हणाल्या.

रणजितसिंह डिसले यांच्याबाबतचा चौकशी अहवाल प्राप्त झालेला असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहिती शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी दिलीय. २०१७ साली रणजितसिंह डिसले यांची जिल्हा शिक्षण प्रशिक्षण केंद्र येथे प्रतिनियुक्तीवर नियुक्ती करण्यात आलेली होती. मात्र या ठिकाणी डिसले गुरुजी हे तीन वर्षे गैरहजर होते. असा अहवाल जिल्हा शिक्षण प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्यांकडून प्राप्त झालेला आहे. त्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. त्यासंदर्भात प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी दिली.

डिसले यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते, अशी माहिती मिळाली होती. प्रतिनियुक्तीच्या काळात डिसले हे जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण या ठिकाणी कार्यरत नसल्याचा या चौकशी अहवालात ठपका आहे. प्रत्यक्षात पडताळणी केली तेव्हा रणजितसिंह डिसले यांनी या काळामध्ये सुमारे ४२ हजार विद्यार्थी आणि दीड हजार शिक्षकांना प्रशिक्षण दिल्याचा अहवाल स्वतः सोलापूरच्या शिक्षण विभागानं लिहिल्याचे दिसले आहे. याशिवाय रणजितसिंह यांच्या पहिल्या वर्षाचा प्रतिनियुक्तीचा जेव्हा मूल्यांकन करण्यात आलं तेव्हा ते समाधानकारक असल्यामुळे पुन्हा दोन वर्षाचा मुदतवाढ देण्याचा निर्णय पुण्याच्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने घेतला त्याचाही पुरावा डिसले यांनी दिला आहे. महत्त्वाचं म्हणजे अकरा महिन्यापूर्वी सादर झालेल्या अहवालावर आता २५ जानेवारीला रणजित डिसले यांना मिळालेला फुलब्राईट स्कॉलरशिपसाठी कागदपत्र दाखल करण्याची वेळ अंतिम टप्प्यावर आल्यावर मगच ही कारवाई का केली जात आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

या सगळ्या प्रकारानं डिसले गुरुजी व्यथित झाले आहेत. इतके की ते शिक्षक म्हणून सरकारी नोकरी सोडण्याच्या मनस्थितीत आहेत. ग्लोबर टीचर पुरस्कार मिळाल्यापासून शिक्षण विभागातल्या काही अधिकाऱ्यांनी त्रास दिला.पैशाची मागणी केली. एवढंच नाही तर फुलब्राईट स्कॉलरशिपसाठी केलेल्या अर्जावरही अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळं फुलब्राईट स्कॉलरशिपही हातातून जाण्याची शक्यता आहे असं डिसले गुरुजींनी सांगितलंय. सरकारी नोकरीत होणाऱ्या त्रासामुळं डिसले गुरुजी उद्विग्न झाल्याचं दिसून आलं होतं.

डिसले म्हणाले की, राज्यपाल येणार होते तेव्हा थेट राज्यपालांशी संपर्क का साधला याचा राग त्यांना आहे. राज्यपालांशी थेट संपर्क झाला, यानंतर अधिकाऱ्यांनी थेट तुझा वारे गुरूजी करू असा निरोप दिला. या व्यवस्थेत राहणे शक्य होत नाही. झोपही लागत नाही. घरी सगळ्यांशी चर्चा केली आहे. बाहेर पडायचे ठरवले आहे. सतत होणाऱ्या आरोपामुळे व्यथित आहे. वारे सर व्हायच्या आधी बाहेर पडणार असल्याचं डिसले गुरुजी म्हणाले.

रणजितसिंह डिसले गुरुजी कारवाईच्या कचाट्यात सापडले आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी यांनी रणजित डिसले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. डिसले गुरुजी गेल्या तीन वर्षांपासून आपल्या शाळेकडे फिरकलेच नाही, तीन वर्षांच्या काळात डिसले गुरुजींनी काय केलं? याबाबत चौकशी समितीचा अहवाल जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे प्राप्त झालाय. त्यामुळं डिसले गुरुजींवर कायदेशीररित्या कारवाई करण्यात येणार आहे असं शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी म्हटलंय. रणजितसिंह डिसले यांना अमेरिकन सरकारकडून दिली जाणारी प्रतिष्ठित फुलब्राईट स्कॉलरशिप रणजितसिंह डिसले यांना जाहीर झाली आहे. याविषयावर संशोधन करण्यासाठी त्यांना सहा महिने अमेरिकेत जाऊन अभ्यास करायचे आहे. यासाठी दीड महिन्यांपूर्वी सोलापूर जिल्हा परिषदेकडे अध्यापन रजा मिळवण्यासाठी अर्ज केला होता. काल जेव्हा डिसले गुरुजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे भेटीला गेले होते तेव्हा सादर केलेल्या अर्जामध्ये त्रुटी असल्याचं सांगितलं गेलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button