मुंबई : केंद्र सरकार व भाजपसोबत परमबीर सिंग यांचे महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे डील झाले होते. त्यातूनच अनिल देशमुख यांच्यावर खोटे आरोप लावण्यात आले. आता केंद्रीय यंत्रणा परमबीर सिंग यांना वाचवण्याचा प्रयत्न करते आहे. मात्र एक दिवस एनआयएला खरे काय आहे हे सांगावे लागेल. सत्य जास्त दिवस लपून राहणार नाही, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मांडले आहे.
परमबीर सिंग यांनी खोटे आरोप आणि राजकीय षडयंत्र करुन अनिल देशमुख यांना फसवले आहे. सरकारला व अनिल देशमुख यांना बदनाम करण्याचा दुरुपयोग केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून झाला, असेही नवाब मलिक म्हणाले. या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीसाठी सरकारने चांदीवाल आयोग नेमला असून, या आयोगासमोर सचिन वाझे याने अनिल देशमुख यांना पैसे दिले नाही, असा जवाब नोंदवला असल्याचे समोर येत आहे, असेही नवाब मलिक यांनी सांगितले.
परमबीर सिंग यांनी जिलेटीनचे जे कांड केले, त्यामध्ये एनआयएने परमबीर सिंग यांचा जवाब नोंदविल्यानंतर ते फरार झाले. मात्र, एनआयएने चार्जशीटमध्ये जो मास्टरमाईंड आहे, तो कोण आहे, हे सांगितले पाहिजे. एनआयएने अद्याप त्यावर चार्जशीट का दाखल केली नाही परमवीरसिंग यांच्या घरात शर्मा आणि वाझे यांची बैठक का झाली. त्यांचे नाव घेतले जाते, ड्रायव्हरचा जवाब सांगितला जातो, इनोव्हा गाडीची चर्चा होते. मात्र, परमबीर सिंगच्या नावाची चर्चा होत नाही. एनआयए केंद्र सरकारच्या दबावाखाली परमबीर सिंग यांना वाचवतेय हे सत्य आहे, असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राज्यातील १०० कोटींच्या खंडणी प्रकरणाला आता वेगळेच वळण लागले आहे. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेने अनिल देशमुख यांना क्लीन चीट दिली आहे. अनिल देशमुख यांनी कधीही पैशांची मागणी केली नाही, असा जबाब वाझे यांनी चांदीवाल आयोगासमोर नोंदवला आहे. यावेळी अनिल देशमुखांचे वकील गिरीश कुलकर्णी यांनी त्यांची उलट तपासणी केली.