मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांच्यातील बैठकीची चौकशी मुंबई पोलिसांकडून होणार आहे. दोघेही चांदीवाला आयोगासमोर हजर झाले होते, त्यादरम्यान दोघांची तासभर भेट झाली. दोघे कोणाच्या परवानगीने भेटले याचा पोलीस तपास करणार आहेत.
सचिन वाझे आणि परमबीर सिंग यांनी केबिनमध्ये बसून सुमारे तासभर चर्चा केल्याचे वृत्त समोर आले. यानंतर आता मुंबई पोलीस या भेटीचा तपास करणार आहेत. या भेटीसंदर्भात माहिती घेण्यासाठी मुंबई पोलिसांचे पथक चांदीवाल आयोगाच्या इमारतीत पोहोचले. अशा प्रकारे दोघांना भेटण्याची परवानगी कुणी दिली आणि त्या भेटीत नेमकं काय झालं, याचा तपास पोलिस करत आहेत.
मुंबई पोलिसांच्या तपासादरम्यान सचिन वाझेला कारागृहातून आयोगासमोर आणणाऱ्या पथकाचीही चौकशी होऊ शकते. आज परमबीर सिंग यांना चांदीवाला आयोगाने समन्स बजावले होते आणि याच दरम्यान सचिन वाझेलाही बोलावण्यात आले होते. दरम्यान, वाझे आणि परमबीर सिंग यांना भेटण्याची परवानगी आयोगाकडून मिळाल्याचा दावा सचिन वाझेच्या वकिलाने केला आहे.