प्रकृती अस्वास्थ्यामुळे परमबीर सिंग ६० दिवसांच्या दीर्घ रजेवर !

मुंबई : राज्य गृहरक्षक दलाचे पोलीस महासंचालक परमबीर सिंग हे २ महिन्यांच्या दीर्घ रजेवर गेले असून या विभागाचा अतिरिक्त कार्यभार ज्येष्ठ आयपीएस अधिकारी के. व्यंकटेशन यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. परमबीर सिंग हे अचानक दोन महिन्यांच्या रजेवर गेल्यामुळे पोलीस दलात चर्चेला उधाण आले आहे. अँटिलिया येथील स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणामुळे परमबीर सिंग यांची मुंबई पोलीस आयुक्तपदावरून राज्य गृहरक्षक दलाच्या पोलीस महासंचालकपदी बदली करण्यात आली. त्यानंतर परमबीर सिंग यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केला. त्यामुळे परमबीर सिंग यांना एकामागून एक येणार्या अडचणींना सामोरे जावे लागले आहे.
सिंग यांच्यावर पोलीस दलातील अधिकार्यांच्या तक्रारीचा पाऊस सुरू झाला होता. मुंबई आणि अकोला पोलीस दलातील दोन पोलीस अधिकार्यांनी केलेल्या तक्रारीनंतर अकोला येथील भीमराव घाडगे या अधिकार्याच्या तक्रारीवरून परमबीर सिंग यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात परमबीर सिंग यांना सध्याच्या घडीला अटकेपासून दिलासा मिळाला असला तरी यांच्यावरील अटकेची तलवार कायम लटकत राहणार आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार परमबीर सिंग हे मागील २ महिन्यांच्या सुट्टीवर गेले आहेत. त्यांनी आजाराचे कारण देऊन दोन महिन्यांची मोठी रजा घेतली असल्याची माहिती समोर येत आहे. परमबीर सिंग हे चंदीगड येथे असल्याची माहिती समोर येत आहे. तेथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून त्याबाबत सादर करण्यात आलेल्या वैद्यकीय अहवालावरून परमबीर सिंग याची प्रकृती ठीक नसल्याचे समजते.