राज्य सरकारकडून नाहक चौकश्या; गंभीर आरोप करत परमबीर सिंग यांची पुन्हा कोर्टात धाव
मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि होमगार्डचे पोलीस महासंचालक परमबीर सिंग यांनी पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. महाराष्ट्र सरकारने लावलेल्या चौकश्यांच्या विरोधात परमबीर सिंग यांनी कोर्टात धाव घेतली आहे.
राज्य सरकारने परमबीर सिंग यांची दोन प्रकरणात चौकशी लावली आहे. या चौकश्यांविरोधात सिंग यांनी आज दुपारी कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत सिंग यांनी गंभीर आरोप केला आहे. १९ एप्रिल रोजी मी राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांना भेटलो होतो. यावेळी त्यांनी तुम्ही केलेल्या तक्रारी मागे घ्या. अन्यथा तुमच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल करण्याची तयारी राज्य सरकारने सुरू करण्यात येणार आहे, असं मला सांगितलं. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी सिंग यांनी याचिकेत केली आहे.
सिंग यांनी आता राज्य सरकारवर नवा आरोप केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या याचिकेवर येत्या ४ मे रोजी सुनावणी होणार आहे. यापूर्वी सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. दरम्यान, परमबीर सिंग यांच्याविरुद्ध अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमबीर सिंग यांच्यासह २७ पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध अॅट्रॉसिटी अॅक्टसह विविध २२ कलमान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अकोल्याच्या पोलीस अधिकारी भीमराज घाडगे यांनी ही तक्रार केली आहे.