राजकारण

परमबीर सिंग चंदीगढमध्ये घरातही नाहीत; सीआयडी पथक हात हलवत परतले !

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात चांदिवाल समितीने अटक वॉरंट जारी केलं आहे. या वॉरंटची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचे सीआयडी पथक परमबीर सिंग यांच्या गावी चंदीगढमध्ये शुक्रवारी गेले होते. परंतु सीआयडीच्या पथकाला परमबीर सिंग चंदीगढच्या घरी सापडले नाहीत. परमबीर सिंग यांच्याविरोधात ३ गुन्ह्यांची नोंद १०० कोटी वसुलीच्या आरोपाखाली आणि १ गुन्हा अ‍ॅट्रोसिटीचा आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचा आरोप केल्यानंतर परमबीर सिंह यांची पोलीस महासंचालकांनी चौकशीला सुरुवात केली होती. यानंतर १ मे पासून प्रकृतीच्या कारणास्तव परमबीर सिंग ४ महिने रजेवर आहेत. ३१ ऑगस्टपर्यंत ते रजेवर होते. मात्र १ सप्टेंबरपासून ते होमगार्डचे महासंचालक कार्यालयात रुजू झालेले नाहीत.

त्यामुळे परमबीर सिंग नक्की कुठे आहेत असा प्रश्न पोलीस दलात विचारला जात आहे. माजी मुबंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी चांदिवाल समितीने अनेक वेळा समन्स बजावले असून परमबीर सिंग एकादाही उपस्थित राहिले नाही. यासाठी दोन वेळा २५-२५ हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला होता. त्यानंतर परमबीर यांच्याविरोधात वॉरंट जारी केले आहे. तर मुंबई पोलिसांकडून लुक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आले आहे. चांदिवाल समितीने जारी केलेल्या वॉरंटवर अमंलबजावणी करण्यासाठी पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी सीआयडीला निर्देश दिले होते.

पोलीस महासंचालकांच्या निर्देशानुसार सीआयडी पथक परमबीर सिंग यांच्या चंदीगढ येथील घरी गेली होती. परंतु तपासादरम्यान चंदीगढमध्ये सीआयडीला परमबीर सिंह सापडले नाही. लुक आऊट सर्क्युलरनुसार सर्व पोलिसांनी इमिग्रेशन विभागात चौकशी केली यामध्ये परमबीर सिंग यांच्या कोणत्याही परदेश वारीची माहिती मिळाली नाही आहे. परमबीर सिंग यांच्या मुंबईतील मलबार हिल येथील घरीही पथकाने तपासणी केली असता तेथे ते आढळले नाहीत. परमबीर सिंग यांच्या अटक वॉरंटविषयी २२ सप्टेंबर रोजी चांदिवाल समिती सुनावणी करणार आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात केलेल्या कथित भ्रष्टाचार प्रकरणात परमबीर सिंग यांना एकूण ५ वेळा समन्स बजावण्यात आले आहेत. तर २ वेळा दंडही ठोठावण्यात आले आहे. यानंतर परमबीर सिंग यांना शेवटी संधी म्हणून अखेर ७ सप्टेंबरला हजर राहण्यास सांगितले होते. परंतु ते हजर राहिले नसल्यामुळे चांदिवाल समितीने त्यांच्याविरोधात वॉरंट जारी केले आहे. परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्याविरोधात कोरोना काळात १०० कोटी महिन्याला खंडणी गोळा करण्याचे आदेश दिले होते असा आरोप केला आहे. तर परमबीर सिंग यांच्याविरोधात मुंबईतील बिल्डर्स आणि उद्योजकांनी तक्रार दाखल केली आहे. यामध्ये ठाण्यात २ तर मुंबईत १ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button