Top Newsराजकारण

पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये परब आणि देशमुखांचा हात; परमबीर सिंग यांचा सनसनाटी दावा

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता बळावत चालली आहे. कारण मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी ईडीला दिलेल्या जबाबात अनेक सनसनाटी दावे केले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मला सचिन वाझेला पुन्हा सेवेत घेण्याच्या सूचना केल्याचा दावा परमबीर सिंग यांनी ईडीकडे केलाय. त्याचबरोबर सचिन वाझेला सेवेत घेतल्यानंतर गुन्हे शाखेत महत्वाच्या पदावर नियुक्ती द्या असंही आपल्याला सांगण्यात आलं होतं, असं परमबीर सिंग यांनी ईडीला दिलेल्या जबाबात म्हटलंय.

परमबीर सिंग ईडीला दिलेल्या जबाबात म्हणाले की, सीआययुमध्ये नियुक्ती दिल्यानंतर काही महत्वाच्या केसेस सचिन वाझेला सोपवण्यात आल्या. त्या केसेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अनिल देशमुख यांनी दिलेल्या सूचनेनुसार वाझेला देण्यात आल्या. टीआरपी घोटाळ्यातील अर्णब गोस्वामी यांचं प्रकरणही याचवेळी वाझेला सोपवण्यात आलं होतं, असंही सिंग यांनी म्हटलंय. त्याचबरोबर सचिन वाझे अनिल देशमुख यांना नियमित रिपोर्ट द्यायचा, त्यांना ब्रिफ करायचा. वाझेनं मला सांगितलं होतं की पुन्हा पोलीस दलात येण्यासाठी त्याच्याकडून अनिल देशमुख यांनी दोन कोटी मागितले होते, असा धक्कादायक खुलासाही परमबीर सिंग यांनी ईडीकडे केलाय.

इतकंच नाही तर, मला वारंवार सह्याद्री गेस्ट हाऊसला बोलावलं जायचं. तिथे अनिल देशमुख आणि अनिल परब यांच्याकडून पोलिसांच्या बदल्यांसंदर्भात यादी मला दाखवली जायची. मुंबईतल्या बदल्यांमध्ये अनिल परब आणि अनिल देशमुख यांचा हस्तक्षेप होता. मी जुलै २०२० मध्ये मुंबईतील डीसीपींच्या बदल्यांची ऑर्डर काढली होती. ती मला सीताराम कुंटे यांनी मागे घ्यायला लावली. त्यावेळी मला व्हॉट्सअ‍ॅप मेसेज सीताराम कुंटे यांनी केला आणि उद्धव ठाकरे यांनी तो आदेश मागे घ्यायला लावला होता, असा दावाही परमबीर सिंग यांनी केलाय. त्यानंतर सीताराम कुंटे यांनी सूचना दिल्याप्रमाणे मी डीसीपींच्या बदल्यांचा आदेश मागे घेतला. कुंटे यांनी केलेला व्हॉट्सअ‍ॅप मेसेज आजही आपल्याकडे आहे. अनिल देशमुख यांचं हस्ताक्षर असलेल्या काही याद्या आजही माझ्याकडे आहेत, असा गौप्यस्फोटही सिंग यांनी ईडीला दिलेल्या जबाबात केलाय.

डीसीपी झोन ७ यांची नियुक्ती ही अनिल देशमुख यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. अनिल देशमुख यांच्यामुळे अनेकदा पोलीस इस्टॅब्लिशमेंट बोर्डच्या नियमांचं उल्लंघन झालं. देशमुख कधी स्वत: तर कधी सीताराम कुंटे यांच्या माध्यमातून नियमांची पायमल्ली करुन सूचना द्यायचे. प्रशांत कदम यांची नियुक्तीही झोन ७ ला अशीच करण्यात आल्याचा खुलासाही परमबीर सिंग यांनी आपल्या जबाबात केलाय.

पोलीस बदल्यांची यादी अनिल परब देत होते, ईडीच्या चार्जशीटमध्ये अनिल देशमुखांचा जबाब

राज्यातील पोलीस बदल्यांवर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. पोलीस बदल्यांची यादी अनिल परबच आपल्याकडे द्यायचे असा अनिल देशमुखांचा जबाब ईडीच्या चार्जशीटमध्ये नोंदविण्यात आला आहे. मला कुठल्याही व्यक्तीनं यादी दिलेली नव्हती, तर अनिल परब यांनी यादी दिली होती. तिच यादी अतिरिक्त मुख्य सचिवांना दिली होती असं अनिल देशमुख यांनी जबाबात नमूद केलं आहे.

याचबरोबर अनिल देशमुखांनी आणखी एक धक्कादायक माहिती दिली आहे. कदाचित अनिल परब यांना शिवसेनेच्या आमदारांकडून ही यादी मिळायची आणि माझ्याकडे द्यायचे, असं अनिल देशमुख यांनी म्हटलंय. देशमुख यांच्या या नव्या आरोपामुळं अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनिल देशमुख म्हणाले, अनिल परब यांनी दिलेली यादीच अतिरिक्त मुख्य सचिवांनी दिली होती. त्यानेळी मी सांगितले होते की, जर बदल्या नियमात बसत असेल तर ही प्रक्रिया करा अन्यथा प्रक्रिया नाही करू नका.

मुंबई पोलीस दलात बदल्यांसाठी असलेल्या समितीच्या अध्यक्षस्थानी पोलीस आयुक्त असतात. या समितीमध्ये पीएसआय ते डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदलीचा निर्णय घेतला जातो. मुंबई पोलिसांतर्गत बदल्यांची यादीही गृहमंत्रालयात तयार करण्यात आली होती. ही यादी मला स्वतः गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अनेकदा दिली होती. त्यांचे स्वीय सचिव संजीव पालांडे किंवा त्यांचे ओएसडी रवी व्हटकर यांनीही अनेकदा दिली होती. बदल्यांची ही यादी शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडून दिली जात होती अशी माहिती परमबीर सिंह यांनी दिली. या यादीची कोणतीही नोंद नसल्याचेही त्यांनी म्हटले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button