पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुखांची बदली; सूत्रे पुन्हा गणेश देशमुखांकडे
नवी मुंबई : पनवेल महानगरपालिकाचे आयुक्त सुधाकर देशमुख यांची बदली करण्यात आली आहे. ते भिवंडी-निजामपूरचे नवे महापालिका आयुक्त असतील. त्यांच्या जागी पूर्वीचेच आयुक्त गणेश देशमुख यांच्या हाती पनवेल महापालिकेचा कारभार देण्यात आला आहे. पनवेल महापालिका हद्दीत कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असताना कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी गणेश देशमुख यांच्या हाती पुन्हा पनवेल महापालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
ऑक्टोबर २०१६ साली पनवेल महापालिकेची स्थापना करण्यात आली. डॉ. सुधाकर शिंदे हे पनवेल महापालिकेचे पहिले आयुक्त आणि प्रशासक होते. निवडणुकीच्या कालावधीमध्ये राजेंद्र निंबाळकर यांच्याकडे तात्पुरता पदभार देण्यात आला. त्यानंतर पुन्हा डॉ . शिंदे यांनी कार्यभार स्वीकारला. पुढे त्यांची महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर नांदेड महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांची या ठिकाणी बदली करण्यात आली. देशमुख यांनी पनवेलमध्ये कोरोना काळात चांगलं काम केलं. नव्याने स्थापन झालेल्या पनवेल मनपा प्रशासनाचा कारभार त्यांनी चांगल्या पद्धतीने चालवला. मागील वर्षी ऐन कोरोना सुरुवात होण्याच्या वेळी त्यांची ठाणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती.
गणेश देशमुख यांची बदली झाल्यानंतर सुधाकर देशमुख हे पनवेलचे नवे आयुक्त झाले. त्यांनी कोरोनात प्रतिकूल परिस्थिती चांगले काम केले. त्याचबरोबर विकास कामे सुद्धा मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. मालमत्ता कराचा निर्णय त्यांच्याच कार्यकाळात झाला. मात्र त्याला सर्वसामान्य जनतेकडून विरोध झाला. दरम्यान मंगळवारी शासनाने अध्यादेश काढून सुधाकर देशमुख यांची भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या आयुक्त पदी बदली केली. त्यांच्या जागेवर या ठिकाणी काम केलेल्या गणेश देशमुख यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे.
गणेश देशमुख यांच्यासमोर मालमत्ता कराची वसुली हे मोठे आव्हान असणार आहे. एकूण पाच वर्षाच्या थकबाकीला सर्वसामान्य जनतेतून मोठा विरोध आहे. मनपा आयुक्त म्हणून यामध्ये तोडगा काढून मालमत्ता कर लागू करणे आणि त्याची वसुली करुन पनवेल महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करणे हे महत्त्वाचे उद्दिष्ट त्यांच्यासमोर असणार आहे. त्याचबरोबर आगामी काळात येणाऱ्या तिसऱ्या लाटेचा योग्य पद्धतीनं सामना करणे हे आव्हान गणेश देशमुख यांच्यासमोर असणार आहे.