बीड : प्रशासन दावणीला बांधलेले असल्यास खोटे गुन्हे दाखल होत आहेत. बीडमध्ये शासन आणि प्रशासन दोघे मिळून अन्याय करत आहेत, त्यामुळे न्याय कोणाकडे मागावा’ असं म्हणत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी करुणा शर्मा प्रकरणावरून नाव न घेता सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला.
काही दिवसांपूर्वी करुणा शर्मा या बीडमध्ये दाखल झाल्या होत्या. परंतु, गाडीत पिस्तुल सापडल्यामुळे त्यांना अटक करून जामीन देण्यात आला आहे. अॅट्रॉसिटी कायदा हा दलितांचे कवच कुंडल आहे, दलित वर्गाच्या सुरक्षेसाठीच त्याचा वापर झाला पाहिजे मात्र, त्याचा दुरुपयोग होतोय हे अतिशय गंभीर आहे. प्रशासन दावणीला बांधलेले असल्यास खोटे केसेस दाखल होतात. तेच सुरू आहे बीडमध्ये शासन आणि प्रशासन दोघे मिळून अन्याय करत आहेत तर न्याय कोणाकडे मागावा, असा घणाघात पंकजा मुंडे यांनी केला आहे.
बीड जिल्ह्यासह राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. याचा तीव्र संताप आणि निराशा मी व्यक्त करते. जिल्ह्यात देखील रोज घटना घडत आहेत, हे फार गंभीर आहे. परळी जवळील सोनपेठमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला. भयानक आहे, मुलीला स्वतःचा जीव गमवावा लागला. जिल्ह्याच्या प्रत्येक ठिकाणी एक माफिया तयार झाले आहे. तसा पोलिसांचा धाक राहिला नाही. खोट्या केसेस केव्हा होतात तर प्रशासन दावणीला बांधलेले असल्यास खोटया केसेस दाखल होतात. प्रशासनाने न्याय्य भूमिका घेणे गरजेचे आहे तर या गोष्टी होणार नाही. मात्र बीड मध्ये दोघेही मिळून काय करत आहेत असा घणाघात पंकजा मुंडे यांनी केला.
महिलावर अत्याचार झाला तर त्याच्यावर विशेष बैठक घेऊन न्याय दिला पाहिजे. जिल्हा नियोजनच्या बैठकीत फक्त बजेट वाटपाचा विषय न होता याही गोष्टींचा विचार केला गेला पाहिजे, जिल्ह्यामध्ये फिरताना महिलांना सुरक्षित वातावरण वाटावं असं काम करा. असा सल्लावजा टोलाही पंकजा मुंडे यांनी नाव न घेता धनंजय मुंडे यांना लगावला.