Top Newsराजकारण

दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा, तर भाजपला घरचा आहेर

सत्तेत असताना तुम्ही मंत्रीपद भाड्याने दिले होते का?; धनंजय मुंडेंचे जशास तसे प्रत्युत्तर

बीड: बीड जिल्ह्यातील भगवानगड येथे दसरा मेळाव्यात भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी जनतेच्या हितासाठी मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण यावर आवाज उठवणार असल्याचा इशारा सरकारला दिला. सुरुवातीला पंकजा मुंडेंनी मंचावरुन आपल्या समर्थकांच्या गावांची नावे घेतली. यादरम्यान समर्थकांकडून मोठ्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी पंकजा मुंडे म्हणतात की, दसरा आणि दसऱ्याची आपली भक्ती आणि शक्तीची परंपरा ही कायम ठेवण्यासाठी या उन्हात घरची पुरणपोळी सोडून तुम्ही सर्वजण येथे उपस्थित झालात, मी नतमस्तक आहे.

हा मेळावा होईल का नाही चर्चा होती, मेळावा नको बोलले कारण सत्ता नाही. कधीकाळी या मेळाव्याने सत्ता पाहिली. मुंडे साहेब सत्तेत नसताना या मेळाव्याने लाखोची संख्या पाहिली, पण कशे राजासारखे राहिलात. कुणी म्हणे अतिवृष्टी आहे कुणी म्हणे कोरोना आहे, लोकांची मनस्थिती नाही. मी म्हटलं अशाच लोकांना ऊर्जा देण्यासाठी मला हा मेळावा घ्यायचा आहे. अधिकाऱ्यांनी विचारलं की लोक येणार, मी म्हटलं मला माहित नाही पण मी जाणार. एवढ्या संख्येने तुम्ही इथे आलात, मला असं वाटतंय की माझ्यासमोर भगवान श्रीकृष्ण साक्षात आहेत.

सावरगावच्या भूमीतून पंकजा मुंडे यांची तोफ प्रचंड धडाडली. अत्यंत अवेशात आणि आक्रमकपणे पंकजा मुंडे यांनी आपले मुद्दे मांडले. हे मुद्दे मांडतानाच त्यांनी थेट स्वपक्षीयांनाही जोरदार टोले लगावले. सरकार पडणार की नाही पडणार यातून बाहेर पडणार की नाही? विरोधी पक्ष रोज मुहूर्त देतो सरकार पडणार आणि सत्ताधारी म्हणतात सरकार पडणार नाही. आता यातून बाहेर पडा. विरोधी पक्षांनी विरोधी पक्षाच्या आणि सत्ताधाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेत लक्ष घाला, असा घरचा आहेरच पंकजा यांनी सत्ताधाऱ्यांना दिला.

यावेळी पंकजा मुंडेंनी राज्यातील परिस्थितीवरुन सरकारवरही निशाणा साधला. त्या म्हणाल्या, ‘काय चालंलय महाराष्ट्रात? स्त्रियांचे प्रश्न वाढलेत, रोज पेपर उघडला, टीव्ही लावला की बलात्काराच्या घटना दिसतात. महिलांवर अत्याचार होत असतात त्यावर जबाब विचारायचा नाही का ? पण, माझ्या घराचे दरवाजे तुमच्यासाठी २४ तास उघडे आहेत.

माझ्यामागे मुंडे साहेबांची किर्ती आणि भगवानबाबांची मूर्ती आहे. हे अत्यंत पवित्र स्थान आहे, या स्थानावर उच्चार करायचा नाही असा कुठलाही शब्द मी उच्चारणार नाही. या स्थानावर ज्या व्यक्तीचा उल्लेख केल्याने भगवान बाबांची मान खाली जाईल अशा कुठल्याही व्यक्तीचा मला उल्लेख करायचा नाही. अशा कुठल्या प्रवृत्तीचाही मला उल्लेख करायचा नाही, असं सांगून पंकजा यांनी आपल्या भाषणाचा रोख स्पष्ट केला. काही लोकांना वाटतंय मी घरात शांत बसले. ते लोक आज खूश असतील. पण माझा दौरा लिहून घ्या, मी आता १७ ते २० तारखेपर्यंत दिल्लीत आहे. त्यानंतर मी २३ ते २५ मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यात आहे. नंतर १२ डिसेंबरला ऊसाच्या फडामध्ये ऊसतोड कामगारांसोबत जाऊन मी गावागावात संवाद साधणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

सत्तेत असताना तुम्ही मंत्रीपद भाड्याने दिलं होतं का?; धनंजय मुंडेंचं प्रत्युत्तर

पंकजांनी आपल्या भाषणात राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही नाव न घेता टीका केली. ‘बीड जिल्ह्याची अवस्था आज काय आहे? यांनी आपलं मंत्रिपद भाड्यानं दिलं आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात यांना काही बोलता येत नाही, असा टोला पंकजा यांनी लगावला होता. त्यावर धनंजय मुंडे यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. पंकजा मुंडे या स्वत: पाच वर्षे बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री होत्या. त्यामुळे मंत्रिपद भाड्यानं देण्याचे आरोप करणं म्हणजे एक केविलवाणा प्रकार आहे. जनतेला माहिती आहे, दोन वर्षात एवढी संकटं असताना मंत्री म्हणून किंवा पालकमंत्री म्हणून काय काम करतोय. त्यामुळे त्यांनी काय म्हणावं हा त्यांचा प्रश्न आहे, असा पलटवार धनंजय मुंडे यांनी केला आहे.

पंकजा मुंडे यांनी भाषणात एक गोष्ट कबुल केली की त्या मंत्रिपद भाड्यानं दिलंय हे बोलल्या. पण त्या मंत्री असताना बीड जिल्ह्यातील आणि त्या सभेला उपस्थित असलेल्या असंख्य ऊसतोड मजुरांना त्यांना न्याय देता आला नाही. त्यावेळेस त्यांचं मंत्रिपद त्यांनी कुणाला भाड्यानं दिलं होतं का?, असा खोचक सवाल धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला.

धनंजय मुंडे यांनी यावेळी पंकजांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्हं उपस्थित केलं. पंकजा नेमक्या कोणत्या बाजूने आहेत? त्या सत्ता पक्षात आहेत की विरोधी पक्षात आहेत? कुठलीतरी एक भूमिका त्यांनी घ्यावी. विरोधीपक्ष हा त्यांचाच पक्ष आहे. त्यांचाच पक्ष सरकार पाडायचा प्रयत्न करतोय. महाराष्ट्रात सरकार पाडण्याचा प्रयत्न केला जातोय. एकीकडे सरकार पाडण्यासाठी त्यांच्या पक्षानं वाट्टेल ते करायचं. दुसरीकडे सरकार पडणार आहे की नाही या गोंधळात राहू नये, असं त्यांनी म्हणायचं. त्यांनी आता स्वत: गोंधळात राहू नये. आज इतक्या अभूतपूर्व संकटाच्या काळात त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं?, असा घणाघात धनंजय मुंडे यांनी केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button