दुबई : भारत-पाकिस्तान यांच्यातला महामुकाबला रविवारी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील इतिहास बदलण्याचा निर्धार पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम यानं व्यक्त केला. या हाय व्होल्टेज सामन्यासाठी पाकिस्ताननं त्यांचे अंतिम १२ शिलेदारांची घोषणा शनिवारी केली. पाकिस्ताननं युवा व अनुभवी खेळाडूंची योग्य सांगड घालताना टीम इंडियासमोर तगडं आव्हान उभं करण्याचा प्रयत्न केला आहे. आता त्यांचे हे शिलेदार प्रत्यक्ष सामन्यात कसे खेळतात हे रविवारीच स्पष्ट होईल.
वर्ल्ड कप स्पर्धेसाठी आमची उत्तम तयारी झाली आहे. एकच रणनीती आहे आणि ती म्हणजे चांगलं खेळा व सर्वोत्तम द्या… त्यानुसारच आम्ही उद्याच्या सामन्यासाठी १२ खेळाडूंची निवड केली आहे. अंतिम ११मध्ये कोण खेळतील याचा निर्णय सामन्यापूर्वी घेतला जाईल, असे बाबर आजमनं स्पष्ट केलं. पाकिस्ताननं या सामन्यासाठी शोएब मलिक व मोहम्मद हाफिज या संघातील सर्वात अनुभवी खेळाडूंचीही १२ खेळाडूंमध्ये निवड केली आहे.
‘भारताविरुद्धच्या सामन्यासाठी युवा व अनुभवी खेळाडूंना एकत्रित घेऊन मैदानावर उतरण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. तंदुरुस्तीचा प्रश्न निर्माण होणार नसेल तर सराव सामन्यातील प्लेइंग इलेव्हनच सामन्यात दिसेल, असेही बाबर आजमनं स्पष्ट केलं.
बाबर आजम आणि मोहम्मद रिझवान ही पाकिस्तानची सलामीची जोडी टीम इंडियाची डोकेदुखी ठरू शकते. २०२१मध्ये आजमनं ३९७ आणि रिझवाननं ५२३ धावा केल्या आहेत. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ही जोडी सातत्यानं धावा करत आहे. मधल्या फळीत हाफिज, शोएब मलिक व आसीफ अली हे सक्षम फलंदाज आहेत. शोएब मलिकचा टीम इंडियाविरुद्ध वन डे सामन्यांतील रिकॉर्ड हा १७८२ धावा व २२ विकेट्स असा आहे. ट्वेंटी-२०त त्यानं ८ डावांत १६४ धावा केल्या आहेत. हाफिजनंही भारताविरुद्ध ७ ट्वेंटी-२०त १५६ धावा केल्या आहेत.
पाकिस्तानचा संघ : बाबर आजम, मोहम्मद रिझवान, फाखर जमान, मोहम्मद हाफिज, शोएब मलिक, आसीफ अली, हैदर अली, इमाद वासीम, शाबाद खान, हसन अली, शाहिन आफ्रिदी, हॅरीस रौफ