Top Newsफोकस

पाकिस्तानमध्ये दहशतवादी हाफिज सईदच्या घराबाहेर शक्तीशाली स्फोट; १२ जण जखमी

लाहोर : पाकिस्तानच्या लाहोरमध्ये जौहर टाउन परिसरात एका राहत्या घरात शक्तीशाली स्फोट झाला आहे. या स्फोटात १२ जण जखमी झाले आहेत. महत्वाची बाब अशी की स्फोट झालेल्या ठिकाणापासून अवघ्या काही अंतरावर दशतवादी हाफिज सईद याचं घर आहे. जिओ न्यूजनं दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावर बॉम्बशोधक पथक आणि पोलीस दाखल झाले असून जखमींना नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार हा स्फोट शहरातील एहसान मुमताज हॉस्पिटलच्या ई ब्लॉकजवळ झाला.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोट इतका भयंकर होता की परिसरातील इमारतीच्या काचा फुटल्या आहेत. तर एक इमारत पूर्णपणे कोसळली आहे. जवळपासच्या गाड्यांचंही मोठं नुकसान झालं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार यात अद्याप १२ जण जखमी झाले आहेत. दरम्यान, या स्फोटामागचं नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. पण हाफिज सईदच्या घराजवळचं स्फोट झाल्यानं यामागे मोठं षडयंत्र असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तसेच स्फोटावेळी हाफिज सईद घरात होता की नाही याचीही काही माहिती अद्याप समोर आलेली नाही.

लाहोरचे पोलीस उपायुक्त मुदस्सिर रियाज मलिक हे स्थानिक समा टीव्हीशी म्हणाले की, या स्फोटात महिला आणि लहान मुलांसह १२ लोक जखमी झाले. स्फोटाचे कारण स्पष्ट झाले नाही, परंतु त्यामुळे घटनास्थळी प्रचंड मोठा खड्डा तयार झाला आहे. मलिक म्हणाले की, या प्रकरणाची चौकशी केली जाईल तेव्हाच स्फोटाची कारणे समजतील. सध्या संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button