Top Newsराजकारण

सरकारच्या नाकावर टिच्चून, पोलिसांना गुंगारा देत पडळकरांची बैलगाडा शर्यत यशस्वी

सांगली : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सरकारच्या नाकावर टिच्चून, पोलिसांना गुंगारा देत एका रात्रीत पाच किलोमीटरचा दुसरा ट्रॅक बनवून बैलगाडा शर्यत पार पाडल्या. आटपाडी तालुक्यातील निंबवडे-वाक्षेवाडी गावांच्या दरम्यान असलेल्या पठारावर आज सकाळी शर्यती झाल्या. बैलगाडी शर्यतींवर न्यायालयाने बंदी घातली आहे. तरीही आ. पडळकर यांनी बैलांच्या संवर्धनासाठी, सरकारला जाग येण्यासाठी शर्यती भरवत असल्याचे जाहीर केले होते. पडळकर यांच्याही मागे पोलिस असतानाही पडळकर यांच्या समर्थकांनी बैलगाडा शर्यत पार पाडून दाखवली आहे. बैलगाडा शर्यत होणारच असं म्हणत पडळकरांनी पोलिस प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं केलं होतं.

यापूर्वी आ. पडळकर यांनी झरे या गावी शर्यती होणार असल्याचं जाहीर केले होते. शर्यती होऊ नयेत यासाठी प्रशासनाने कंबर कसली होती. हजारावर पोलिसांचा फौजफाटा तैनात केला होता. झरे गावाकडे येणारे रस्ते बंद केले होते. परिसरातील ९ गावांमध्ये बुधवारपासून संचारबंदी जाहीर करण्यात आली होती. मात्र आ. पडळकर यांनी शुक्रवारी गनिमी काव्याने शर्यतींची जागा बदलली. बदललेल्या ठिकाणी त्यांनी शर्यती पार पाडल्या.

कायद्याने बंदी असल्याने कोणत्याही परिस्थितीत बैलगाडा शर्यत होऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा पोलिस प्रशासनाने घेतला होता. मात्र कोणत्याही परिस्थितीत बैलगाडा शर्यत पार पडणारच, असा निर्धारच पडळकरांनी केला होता. त्यानुसार पडळकर आणि त्यांचे समर्थक कामाला लागले. झरे गावात बैलगाडा शर्यत पार पडणार होती. मात्र पोलिसांनी गावच्या मुख्य मैदानाची धावपट्टीच उखडून टाकली होती. त्यानंतर मात्र पडळकर समर्थकांनी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास तिथूनच पाच किमी अंतरावर दुसऱ्या एका मैदानात धावपट्टी तयार केली आणि पुढच्या काही तासांत तिथे स्पर्धा भरवली. या शर्यतीत पाच ते सहा बैलगाडा चालक आणि मालक सहभागी झाले होते. तसंच ही स्पर्धा पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. यानिमित्ताने पडळकर समर्थकांनी पोलिस आणि प्रशासनाला मोठा गुंगारा दिल्याचं पाहायला मिळालं. पोलिसांना गाफील ठेऊन ही शर्यत पार पडली.

गेल्या चार ते पाच दिवसांपासून बैलगाडा शर्यतीच्या आयोजनावरुन मोठं राजकारण रंगलेलं होतं. बंदी असली तरी बैलगाडा शर्यतीचं आयोजन करणारच, अशी आक्रमक भूमिका पडळकर यांनी मांडली होती. तर आम्ही परवानगी देणार नाही, अर्थात शर्यत पार पडणार नाही, अशी भूमिका पोलिस-प्रशासनाने घेतली होती. त्यामुळे पडळकर समर्थकांची बैलगाडा शर्यत पार पडणार की नाही, याची राज्यभरात मोठी उत्सुकता होती. अखेर पडळकर समर्थकांनी स्पर्धेचं यशस्वीपणे आयोजन केलेलं आहे. स्पर्धेनंतर समर्थकांनी मोठा जल्लोष केला.

पडळकर म्हणतात शर्यत झाल्याचे माहीतच नाही !

काही शेतकऱ्यांनी, बैलगाडा चालक मालकांनी बैलगाडा शर्यत पार पाडली असल्याचं आम्हाला प्रसारमाध्यमांतून कळत आहे. आम्ही अद्याप त्या ठिकाणी गेलेलो नाही. झरे गावात मोठा पोलिस फौजफाटा होता. कायदा आणि सुवव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस प्रशासनाने आम्हाला विनंती केली होती. त्यांच्या विनंतीला मान आम्ही दिला. पण आता आम्हाला काही शेतकऱ्यांनी स्पर्धा पार पाडली आहे, अशी माहिती कळतेय, असा दावा आ. गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

तुमच्याच समर्थकांनी ही शर्यत पार पाडली का? असा प्रश्न विचारल्यावर पडळकरांनी दावा खोडून काढत, बैलगाडा हा कोणताही समर्थक नाही. बैलगाड्याला जात, पात, धर्म, प्रांत काहीही नाही… गोवंश वाचवला पाहिजे, त्याचं जतन केलं पाहिजे, अशी आमची साधी भूमिका आहे. जर आपण गोवंश जतन केला नाही, तर येणाऱ्या पिढीला आपल्याला चित्रात बैल दाखवण्याची वेळ येईल, असं पडळकर म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button