
टोक्यो : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूला टोक्यो ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. महिला एकेरीच्या सामन्यात सिंधूला चिनी तैपेईच्या ताई झू यिंगने १८-२१, १२-२१ असे सरळ गेममध्ये पराभूत केले. त्यामुळे तिचे ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न भंगले. सिंधूने २०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये पदार्पणात रौप्यपदक पटकावण्याची दमदार कामगिरी केली होती. यंदा तिला सुवर्णपदक जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र, तिला उपांत्य फेरीत चांगला खेळ करता आला नाही. आता रविवारी तिचा कांस्यपदकासाठी चीनच्या ही बिंगजिओशी सामना होईल.
उपांत्य फेरीत यिंगविरुद्धच्या सामन्यातील पहिल्या गेममध्ये सिंधूने सुरुवातीला चांगला खेळ केला. त्यामुळे मध्यंतराला तिच्याकडे ११-८ अशी आघाडी होती. यानंतर मात्र यिंगने दमदार पुनरागमन केले. तिने सलग तीन गुण मिळवत या गेममध्ये ११-११ अशी बरोबरी केली. यिंग आणि सिंधू या दोघींनीही झुंजार खेळ केल्याने या गेममध्ये १४-१४, १६-१६ आणि १८-१८ अशी बरोबरी होती. परंतु, यिंगने पुढील तीनही गुण जिंकत पहिला गेम २१-१८ अशा फरकाने जिंकला. दुसऱ्या गेममध्ये सिंधूचा खेळ अधिकच खालावला. ती सुरुवातीपासूनच पिछाडीवर पडली. मध्यंतराला यिंगकडे ११-७ अशी आघाडी होती. यानंतर सिंधूने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात तिला फारसे यश आले नाही. यिंगने हा गेम २१-१२ असा जिंकत सामन्यात बाजी मारली आणि स्पर्धेत आगेकूच केली.